नुकसान भरपाईसाठी कर्ज काढण्याची तयारी ! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक 

तात्या लांडगे
Friday, 23 October 2020

ठळक बाबी... 

  • नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन माहिती ऑनलाइन भरण्याचे प्रशासनाला आदेश 
  • पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाईची निश्‍चित होणार रक्‍कम 
  • राज्य सरकार नुकसानग्रस्तांना करणार तातडीची मदत; केंद्रालाही पाठविला जाणार मदतीचा प्रस्ताव 
  • नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर भरपाईसाठी राज्य सरकार काढणार कर्ज 
  • नुकसानग्रस्तांच्या मदतीचे निकष बदलणे, प्रथम किती भरपाई द्यायची, किती कर्ज काढावे लागेल, यावर आज चर्चा 

सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. त्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीची घोषणा केली जाणार आहे. नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकार तेवढे कर्ज काढण्याच्या तयारी असल्याची माहिती मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा होणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

 

ठळक बाबी... 

  • नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन माहिती ऑनलाइन भरण्याचे प्रशासनाला आदेश 
  • पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाईची निश्‍चित होणार रक्‍कम 
  • राज्य सरकार नुकसानग्रस्तांना करणार तातडीची मदत; केंद्रालाही पाठविला जाणार मदतीचा प्रस्ताव 
  • नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर भरपाईसाठी राज्य सरकार काढणार कर्ज 
  • नुकसानग्रस्तांच्या मदतीचे निकष बदलणे, प्रथम किती भरपाई द्यायची, किती कर्ज काढावे लागेल, यावर आज चर्चा 

 

 

राज्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर मदत व पुनवर्सन विभागाने जुलै- ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल पाठवा, असे पत्र विभागीय आयुक्‍तांना दिले होते. मात्र, कोरोनामुळे त्यावेळी पंचनामे होऊ शकले नाहीत. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमधील एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच राज्यात पुन्हा परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे आता सर्वच पंचनामे एकत्रित करुन नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिले आहेत. त्यानुसार युध्दपातळीवर कार्यवाही सुरु झाली असून पुढील आठवड्यात संपूर्ण अहवाल राज्य सरकारला सादर होईल. नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्‍कम निश्‍चित करुन तेवढे कर्ज काढले जाईल, अशी माहिती मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

पिकनिहाय हेक्‍टरी मदतीवर लवकरच निर्णय 
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ऊस, तूर, कांदा, मूग, केळीसह अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेती खचली आहे. या पार्श्‍वभूमीवर पिकनिहाय हेक्‍टरी मदत किती केली जावी, यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यात आज बैठक होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. तर पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा होईल आणि तत्काळ मदत वितरीत केली जाईल, असा विश्‍वास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparing to take out a loan for compensation! Meeting of Chief Minister and Deputy Chief Minister today