esakal | सोलापूर बाजार समितीत आज कांद्याचा भाव गेला पाच हजारपार 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर बाजार समितीत आज कांद्याचा भाव गेला पाच हजारपार 

कांद्याची आजची स्थिती 
आवक-17 हजार 240 क्विंटल 
कमीत कमी भाव-100 रुपये प्रतिक्विंटल 
जास्तीत-जास्त भाव-5050 रुपये प्रतिक्विंटल 
सरासरी भाव-2100 रुपये प्रतिक्विंटल 

कांद्याची मागील वर्षीची आजच्या दिवसाची स्थिती 
आवक-6900 क्विंटल 
कमीत-कमी भाव-400 रुपये प्रतिक्विंटल 
जास्तीत-जास्त भाव-5025 प्रतिक्विंटल 
सरासरी भाव-3000 रुपये प्रतिक्विंटल 

सोलापूर बाजार समितीत आज कांद्याचा भाव गेला पाच हजारपार 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजार 50 रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव आहे. बाजार समितीमध्ये आज सातारा जिल्ह्यातील म्हसवड, पुणे, नगर, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या राज्यातील जिल्ह्यांबरोबरच कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातूनही कांदा विक्रीसाठी आला होता. 

सोलापूर बाजार समिती राज्यात कांद्याच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात आवक दरवर्षी बाजार समितीमध्ये होते. तेवढ्या कांद्याची लिलाव प्रक्रिया बिनदिक्कतपणे बाजार समितीमध्ये केली जाते. त्याचबरोबर राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भावही बाजार समितीमध्ये मिळतो. 

कांद्याच्या प्रश्‍नावरुन सध्या देशातील राजकारण तापले आहे. केंद्राने कांद्याची निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकावर सगळीकडून टीका केली जात आहे. बंदरे, गोदामांमध्ये निर्यातीसाठी गेलेल्या कांद्याचे करायचे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने त्या कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली होती. आता निर्यात बंदीही मागे घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमिवर कांद्याच्या भावाचा मुद्दा महत्वाचा आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 700 ते 800 गाड्यांची आवक हंगामामध्ये होत असते. तेवढ्या सगळ्या कांद्याचा लिलाव होऊन तो इतरत्र पाठविलाही जातो. कांद्याच्या विक्रीतून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात सेसही मिळतो. राज्यात कांद्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीस घेऊन येण्यास शेतकरी प्राधान्य देतात. बाजार समितीमध्ये आज आलेला कांदा हा जुना व नवीनही होता. कर्नाटकातून आलेला कांदा नवीन होता. जवळपास 25 ते 30 गाड्या कांदा नवीन होता. उर्वरित कांदा जुना होता. जो कांदा वाळलेला आहे म्हणजेच जुना आहे त्याला पाच हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. नवीन कांद्याला साधारणपणे चार हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सोलापूर बाजार समितीत आज झालेल्या कांद्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये बाजार समितीत तीन कोटी 62 लाख चार हजार रुपयांची उलाढालही झाली आहे.