पंतप्रधान मोदींनी फोन केला, पण अतिवृष्टीची मदत दिलीच नाही ! राज्याने केली 3721 कोटींची मागणी

तात्या लांडगे
Sunday, 21 February 2021

केंद्राच्या मदतीची प्रतीक्षाच
राज्यात जुलैनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 46 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना दोन टप्प्यात साडेचार हजार कोटींची मदत दिली. केंद्र सरकारकडे तीन हजार 721 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्याप मदत मिळालेली नाही.
-सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

सोलापूर : जुलै ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने 'एसडीआरएफ' दोन टप्प्यात साडेचार हजार कोटींची मदत देण्यात आली, तर 'एनडीआरएफ' केंद्र सरकारने तीन हजार 721 कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्ताव नोव्हेंबरमध्ये पाठविण्यात आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही तत्काळ मदत मिळावी, म्हणून थेट पंतप्रधानांना पत्र पाठविले. मात्र, अद्याप एक दमडाही मिळाला नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्राच्या मदतीची प्रतीक्षाच
राज्यात जुलैनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 46 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना दोन टप्प्यात साडेचार हजार कोटींची मदत दिली. केंद्र सरकारकडे तीन हजार 721 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्याप मदत मिळालेली नाही.
-सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

 

राज्यात अतिवृष्टी झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली. मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील बहुतेक नेत्यांनी नुकसानीची त्यावेळी पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून कॉल करीत आवश्‍यक ती मदत दिली जाईल, असे सांगितल्याची कबुली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापुरात बोलताना दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून मदतीची मागणी केली. मात्र, अतिवृष्टी झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच 21 ते 23 डिसेंबर या काळात केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, अशी ग्वाहीदेखील पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, राज्य सरकारला केंद्राकडून दमडादेखील मिळाला नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील आठ लाखांहून अधिक नुकसानग्रस्तांना अतिवृष्टीची मदत मिळू शकली नसल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे विविध करापोटी राज्य सरकारला मिळणारे अंदाजित 35 ते 40 हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकून पडल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

अतिवृष्टीची स्थिती (जुलै ते ऑक्‍टोबर 2020)
नुकसानग्रस्त जिल्हे
34
नुकसानग्रस्त शेतकरी
62.14 लाख
राज्याकडून वितरित झालेली मदत
4,500 कोटी
केंद्राला पाठविलेला प्रस्ताव
3,721 कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi called Chief Minister Uddhav Thackeray, but did not get any help for the damage caused by the heavy rains