सरळसेवेच्या निविदेला तारीख पे तारीख: तब्बल २६ वेळा मुदतवाढ देऊनही प्रक्रिया अपूर्ण

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 9 September 2020


- तब्बल २६ वेळा वेळा मुदतवाढ देऊनही प्रक्रिया अपूर्ण 
- अर्ज भरून दोन वर्ष झाल्याने उमेदवार हतबल

पुणे : "सरळसेवा भरतीसाठी १३ मार्च रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा पासून आत्तापर्यंत तब्बल सव्वीस वेळा निवीदेला मुदतवाढ मिळाली. एवढा वेळ जर फक्त निविदेत जाणार असेल तर आमची भरती कधी होणार?,  लाखो उमेदवार या प्रक्रियेकडे लक्ष देऊन आहेत, लवकर  प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, वेळ आणि  वय दोन्ही वाया जात असल्याचे अतुल पाटील सांगत होता. अतुलने जिल्हा परिषदेसाठी दीड वर्षापूर्वी अर्ज भरला आहे, अशीच स्थिती राज्यातील जवळपास ३२ लाख तरुणांची आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महायुती सरकारच्या काळात सरळ सेवेच्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्या ऐवजी 'महाआयटी'तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली आहे. भरतीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून खासगी कंपनी ऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती करावी अशी मागणी समोर आली. पण ही मागणी फेटाळून लावत खासगी कंपनीकडून भरती करण्यासाठी राज्य सरकारने नुकताच आदेश काढला. राज्यातील सुमारे ४० हजार वर्ग दोन व तीनची पदे भरली जाणार असून त्यासाठी सुमारे ३२ लाख अर्ज आले आहेत. 

लाॅकडाऊनपुर्वी निविदा प्रक्रिया राबविता तांत्रिक अडचणींमुळे निविदा पुढे ढकलली जात असल्याचे महाआयटी विभागाने स्पष्ट केले. त्यानंतर लाॅकडाऊनमुळे कागदपत्रांची पुरर्ता करणे शक्य झाले नाही म्हणून मुदतवाढ दिली असे कारणे देण्यात आली. गेल्या सहा महिन्यापासून २६ वेळा निवीदेला मुदतवाढ दिल्याने नेमक्या कसल्या तांत्रिक अडचणी येत आहेत याबाबत उमेदवार प्रश्न उपस्थित करत आहेत. १० सप्टेंबर रोजी निवीदेची अखेरची तारीख आहे, त्यात परत मुदतवाढ मिळणार की निविदा अंतिम होणार याकडे लक्ष उमेदवारांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाआयटीचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"जिल्हा परिषद मधील कनिष्ठ अभियंता या पदासाठी मी दीड वर्षापूर्वी अर्ज भरला आहे. पण आमची सरळसेवेची परीक्षा कधी होईल याचा काहीच अंदाज येत नाही. उमेदवारांच्या मानसिकतेचा विचार करून भरती प्रक्रिया सुरू करावी."
- प्रकाश पाटील, उमेदवार

"महाआयटी कडून कंपनी नेमणूक होऊन लवकर सरळ सेवा पद भरती करावी यासाठी कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्याशी देखील वारंवार संपर्क करून विचारणा केली जाते, ते सकारात्मक असल्याचे सांगतात, पण प्रत्यक्ष कृती शून्य आहे."
- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

ही आहेत पदे
आरोग्यसेवक, कृषीसेवक, शिक्षण सेवक, पोलीस शिपाई, ग्रामसेवक, तलाठी, कनिष्ठ अभियंता, सेवक, लिपीत यासह अनेक पदांची भरती केली जाते, ही पद राज्य शासनाच्या विभागासह राज्यातील सर्व जिल्हा परिषद,  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The process is incomplete even after giving 26 extensions to direct service recruitment