esakal | पंकजा मुंडेंना आणखी एक दणका; भविष्य निधी कार्यालयाने दिले 'हे' आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Provident Fund Office has order to Vaidyanath sugar factory to deposit employees fund

- पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याला भविष्य निधी कार्यालयाचा दणका
- कर्मचाऱ्यांचे रखडलेले भविष्य निर्वाह निधी तात्काळ खात्यात जमा करण्याचे आदेश!

पंकजा मुंडेंना आणखी एक दणका; भविष्य निधी कार्यालयाने दिले 'हे' आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वै. येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शासनाच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांचे दीड वर्षापेक्षा अधिक काळाचे रखडलेले भविष्य निर्वाह निधीपैकी अर्धी रक्कम २४ तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात भरण्याचे आदेश दिले आहेत.

कारखाना प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी कपात केले परंतु ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यात भरले नाहीत, म्हणून कर्मचारी राठोड यांनी पीएफ कमिशनर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर बुधवारी (दि. ३० ऑक्टोबर, २०१९) रोजी पीएफ कमिशनर औरंगाबाद यांनी सुनावणी करत वरील आदेश दिला. यावेळी तक्रारकर्ते राठोड यांच्या वतीने ऍड. कवडे यांनी काम पाहिले तर कारखाना प्रशासनाच्या वतीने मॅनेजिंग डायरेक्टर दीक्षित हजर होते. 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ कारखान्याचा संबंध आशिया खंडात नावलौकिक होता, परंतु गेल्या 4-5 वर्षात कारखाना सतत नुकसानीत असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कर्जबाजारी झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन व भविष्य निर्वाह निधी रखडलेले होते. फक्त पी. एफ. ची रक्कम तबबल 2 कोटी 94 लाख रुपये इतकी आहे. अनेक वेळा विनंत्या करूनही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसत ऐन निवडणुकीत पंकजाताईना चांगलेच अडचणीत आणले होते. 

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरून कारखाना प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे वेतन जिल्हा बँकेकडून कर्ज घेत अदा केले मात्र भविष्य निर्वाह निधीबाबत शासनाला विनंती करत 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत मागितली होती. 

परंतु, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे आयुक्त (पीएफ कमिशनर) यांनी यावर बुधवारी (दि. 30) सुनावणी करत २४ तासाच्या आत रखडलेल्या निधींपैकी अर्धी रक्कम कारखान्याने भरावी तरच मुदतवाढी बाबत विचार करू, असा आदेश कारखाना प्रशासनाला दिला आहे. तसेच कारखान्याने आज (दि. ३१) रोजी पर्यंत अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा केल्यास पुढील मुदतवाढी संबंधीची सुनावणी दि. १४ नोव्हेम्बर रोजी घेणार असल्याचेही आपल्या आदेशात म्हटले आहे.

कारखान्याने न्याय दिलाच नाही
कारखान्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्काचे वेतन आणि पीएफ मिळावे यासाठी कर्मचार्‍यांनी अनेक दिवस कुटुंबासमावेत उपोषण केले मात्र या उपोषणाची साधी दखल घेण्याचे सौजन्य कारखाना प्रशासनाने दाखवले नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपोषणार्थीना भेटून दिलासा दिला तसेच प्रशासन दाद देत नसल्याने भविष्य निधी कार्यालयाकडे तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन आणि सहाय्य  केल्याने कर्मचा-यांना न्याय मिळाला आहे.

loading image