PSI परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढविली; आयोगाची सूचना जारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पुणे- पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेसाठीची वयोमर्यादा वाढविण्यात आली असून, त्यासंबंधीची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली आहे. आता पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीकरीता कमाल वयोमर्यादा खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 31 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 34 वर्षे करण्यात आली आहे. 

राज्याच्या गृह खात्याने मंगळवारी 19 डिसेंबर रोजी यासंबंधीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी 7 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये 1 एप्रिल 2016 रोजी खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वरून 31 वर्षे एवढी करण्यात आली आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 31 वरून 34 वर्षे करून दोन्ही वर्गांची वयाची अट 3 वर्षांनी वाढवली आहे. 

यासंबंधीची जाहिरात 7 डिसेंबरला प्रसिद्ध झाली तेव्हा त्यामध्ये वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच असल्याचे निदर्शनास आल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊन सुधारित जीआर लवकरच प्रसिद्ध करण्याचे आश्वासन हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने दिले होते. 

या सुधारित निर्णयामुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. अर्ज सादर करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत 31 डिसेंबर 2016 आहे. त्यानंतर ती वेबलिंक बंद होईल. 
तसेच, स्टेट बँकेत शुल्क भरावयाचे असल्यास त्यासाठी आवश्यक चलनाची प्रिंट आऊट 31 डिसेंबरपर्यंतच घेता येईल. ते चलन बँकेत 2 जानेवारीपर्यंतच स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर भरलेले शुल्क अवैध ठरेल. तसेच त्याचा परतावाही मिळणार नाही, असे राज्य लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: PSI exam age limit increased