केडगाव, (जि. पुणे) - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन १९७८ मध्ये केलेला ‘पुलोद’ प्रयोग हा राज्याच्या राजकारणातील अविस्मरणीय घटना मानली जाते. सरकार स्थापनेनंतर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री शरद पवार व पाच मंत्र्यांचा शपथविधी झाला होता..पावसाळी अधिवेशनाला एकट्या पवार यांनी तोंड दिले होते. यावेळी पवार यांचे वय अवघे ३८ वर्ष होते. आता येत्या सोमवारपासून (ता. १६) विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. पण, आतापर्यंत तीनच मंत्र्यांच्या शपथविधी झाला आहे. त्यामुळे ‘पुलोद’च्या आठवणींना उजाळा मिळाला आहे..राज्यातील सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस (इं) व काँग्रेस (रेड्डी) यांनी एकत्र येऊन संयुक्त सरकार स्थापन केले होते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री व नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. मात्र, तिरपुडे यांच्या आघाडीतील नेत्यांवरील टीकेमुळे सरकार चालविणे मुश्कील झाले होते. वसंतदादा पाटील हेही वैतागले होते. दोन्ही काँग्रेसमधील दरी वाढत गेली. हे सरकार पडावे, अशी यशवंतराव चव्हाण यांची पण अप्रत्यक्ष इच्छा होती..शरद पवार म्हणजे महत्वकांक्षी नेते. काँग्रेसमध्ये आपल्याला काही भवितव्य नाही, असे लक्षात आल्याने १३ जुलै १९७८ रोजी शरद पवार यांच्यासह चार मंत्र्यांनी राजीनामे दिले. यामध्ये सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे व सुंदरराव सोळंके सामील होते. राजीनामे दिल्यानंतर पवार यांना अनेकांनी खिंडीत गाठले. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना चार मंत्र्यांसह ४० आमदार पवार यांच्यासोबत सरकारमधून बाहेर पडले आणि संयुक्त सरकार अल्पमतात आले..सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी ‘समाजवादी काँग्रेस’ची स्थापना केली आणि जनता दलाशी युती करून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) तयार करून सत्ता स्थापन केली. जनता पक्षाचे एस. एम. जोशी यांनीही पवार यांना नेतृत्व बहाल केले होते..त्यावेळी आबासाहेब कुलकर्णी, एस. एम. जोशी आणि किसन वीर आदी वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी होते. अशा रीतीने १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. यात पवार यांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते..महाराष्ट्रातील हे पहिलेच आघाडी सरकार होते. या घडामोडींमुळे राज्यात एक इतिहास घडला होता. शरद पवार यांनी आपली कसब वापरत वेगवेगळ्या विचारधारेच्या नेत्यांना, पक्षांना एकत्र आणून हे सरकार स्थापन केले होते. वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी त्यांनी राज्याचे नेतृत्व हातात घेतले.सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा त्यांच्यासह फक्त सहा मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. सुंदरराव सोळंके व पवार या दोघांनाच मंत्रिपदाचा अनुभव होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.