केरळमध्ये आज मॉन्सूनची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

'मोरा' चक्रीवादळामुळे प्रवासाला गती; तीव्रता वाढणार

'मोरा' चक्रीवादळामुळे प्रवासाला गती; तीव्रता वाढणार
पुणे - बंगाल उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर सोमवारी चक्रीवादळात झाले. या चक्रीवादळाला मोरा हे नाव दिले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणारे हे चक्रीवादळ येत्या मंगळवारी (ता. 30) बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) पुढील प्रवासाला गती मिळेल. पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये बरसेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

बंगाल उपसागरामध्ये रविवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचे रूपांतर सोमवारी मोरा चक्रीवादळात झाले. पुढील चोवीस तासांमध्ये त्याची तीव्रता वाढणार आहे. पुढे त्याचा प्रवास बांगलादेशाच्या दिशेने होणार असून, तेथील किनारपट्टीवर ते धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

बांगलादेशाच्या दिशेने घोंगावत जाणारे चक्रीवादळ भारतातील मॉन्सूनसाठी अनुकूल असते. हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात बाष्प त्याच्या बरोबर घेऊन जाते. या दरम्यान, अरबी समुद्रात मॉन्सूनला पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्‍यता असून, श्रीलंकेमध्ये मॉन्सूनने चांगली प्रगती केली आहे, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात वळवाच्या पावसाची शक्‍यता
कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पुढील चोवीस तासांमध्ये वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भात मंगळवारी सोसाट्याचा वारा वाहणार असून, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पुण्यातील तापमान घटले
शहर आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलेल्या कमान तापमानाचा पारा आता पस्तीशीपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्‍यांपासून पुणेकरांची सुटका झाली आहे. शहर आणि परिसरात आकाश ढगाळ असल्याने कमाल तापमान कमी झाले. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहील, असेही हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune maharashtra news monsoon chances in keral