महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

स्वप्नील जोगी
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

शाहरुख-आमिरच्या 'फ्रेंडशिप'सोबतच रंगला 'पाण्याचा आनंदसोहळा' !
बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून गेली अनेक वर्षं एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे आणि लोकप्रिय खान त्रयीतील दोन खंदे वीर असणारे शाहरुख आणि आमिर... आपापल्या चाहत्यांची दोन स्वतंत्र अन समृद्ध बेटं मिरवणाऱ्या या दोघांमधला मैत्रीचा अनोखा धागा रविवारी पुण्यात 'फ्रेंडशिप डे'च्याच दिवशी उलगडलेला पाहायला मिळाला... आजारी असल्याने सोहळ्याला उपास्थित न राहू शकणाऱ्या आमिरने शाहरुखला खास आपल्या अनुपस्थितीत पुण्यास जाण्याची विनंती केली आणि शाहरुखने सुद्धा ती लगेच मान्य केली. शाहरुखने मित्र आमिरच्या कामाचे कौतुकही केले.

पुणे : "जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत नक्कीच दुष्काळमुक्त होऊ शकतो. 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' हे येत्या काळात निर्माण करणे आवश्यक आहे. तसे घडल्यास पुन्हा कधीही कर्जमाफी करायची गरजच राहणार नाही," असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप २०१७ स्पर्धेचे पारितोषिक वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. अभिनेता शाहरूख खान, राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, महापौर मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होते. पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान व किरण राव हे स्वाईन फ्ल्यूने आजारी असल्यामुळे त्यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

या वेळी माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज (जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. खटाव (जि.सातारा) तालुक्यातील भोसरे आणि धारूर (जि.बीड) तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना ३० लाख रुपयांचे दुसरे बक्षीस विभागून देण्यात आले. तर आर्वी (जि. वर्धा) तालुक्यातील काकडदरा या गावाला ५० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

फडणवीस म्हणाले, " मनात आणल्यावर एखादा माणूस काय करू शकतो, हे आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तर सर्वांनी एकजुटीने काम केल्यास काय होऊ शकते, हे तुम्ही दाखवून दिले आहे. वॉटर कपने जलयुक्त शिवारला नवे स्वरूप दिले आहे आणि महाराष्ट्रात नवी क्रांती आणली आहे. महाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठे काम असू शकत नाही."

शाहरुख-आमिरच्या 'फ्रेंडशिप'सोबतच रंगला 'पाण्याचा आनंदसोहळा' !
बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून गेली अनेक वर्षं एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे आणि लोकप्रिय खान त्रयीतील दोन खंदे वीर असणारे शाहरुख आणि आमिर... आपापल्या चाहत्यांची दोन स्वतंत्र अन समृद्ध बेटं मिरवणाऱ्या या दोघांमधला मैत्रीचा अनोखा धागा रविवारी पुण्यात 'फ्रेंडशिप डे'च्याच दिवशी उलगडलेला पाहायला मिळाला... आजारी असल्याने सोहळ्याला उपास्थित न राहू शकणाऱ्या आमिरने शाहरुखला खास आपल्या अनुपस्थितीत पुण्यास जाण्याची विनंती केली आणि शाहरुखने सुद्धा ती लगेच मान्य केली. शाहरुखने मित्र आमिरच्या कामाचे कौतुकही केले.

Web Title: Pune news Devendra Fadnavis talked on drought free maharashtra