
देशात स्टार्टअपसाठी अनेक व्यासपीठ निर्माण होत असून आत्मनिर्भर या संकल्पने अंतर्गत अनेक स्टार्टअपला संधी मिळत आहे.
राज्यातील सर्वाधिक स्टार्टअपची नोंद पुण्यात
पुणे - कोरोनाच्या काळात सर्व क्षेत्रांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. तर कित्येक उद्योग बंद पडले आहेत. मात्र अनेक स्टार्टअप्ससाठी हा काळ निर्णायक व संधी देणारा ठरला. यामध्ये राज्याची स्थिती पाहता पुण्याने चमकदार कामगिरी केली आहे. मागील दोन वर्षांत राज्यातील सर्वाधिक स्टार्टअपची नोंद पुण्यात झाली आहे. ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’द्वारे (डीपीआयआयटी) नोंदणी केलेल्या स्टार्टअपच्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पुण्यात स्टार्टअपचे क्षेत्र विस्तारत असल्याचे यातून पुढे येत आहे.
देशात स्टार्टअपसाठी अनेक व्यासपीठ निर्माण होत असून आत्मनिर्भर या संकल्पने अंतर्गत अनेक स्टार्टअपला संधी मिळत आहे. दरम्यान राज्यातील स्टार्टअपची स्थिती नेमकी कशी आहे याबाबतची माहिती नुकतीच लोकसभेत वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी लेखी उत्तरात दिली. त्यानुसार राज्यात पुण्यात सर्वाधिक स्टार्टअप असल्याचे समजले. पुण्यात २०२० मध्ये ७५० हून अधिक तर, २०२१ साली एक हजारापेक्षा जास्त स्टार्टअपची नोंद झाली आहे.
राज्यातील स्टार्टअपची संख्या
वर्ष - स्टार्टअपची संख्या
२०२० - २ हजार ६८५
२०२१ - ३ हजार ७२१
या तीन जिल्ह्यांमध्ये मागील दोन वर्षांत स्टार्टअपच्या संख्येत वाढ -
जिल्हा - वर्ष २०२० - वर्ष २०२१
पुणे - ७७५ - १०२२
मुंबई शहर - ७४९ - १००१
ठाणे - ३५० - ५२०
मुंबई शहर उपनगरांसह - २४५ - २८७
नागपूर - १२४ - १६२
स्टार्टअपची संख्या वाढण्यासाठी सरकारचे हे उपक्रम ठरताय महत्त्वाचे -
- स्टार्टअप इंडिया अॅक्शन प्लॅन
- स्टार्टअप्ससाठी निधीचा निधी:
- नियामक सुधारणा
- बौद्धिक संपदा संरक्षणासाठी समर्थन
- कामगार आणि पर्यावरण कायद्यांतर्गत स्वयं-प्रमाणन
- तीन वर्षांसाठी प्राप्तिकरात सूट
- भारतीय स्टार्टअपसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश
- स्टार्टअप इंडिया हब
- स्टार्टअप इंडिया शोकेस
- राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषद
- स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना (एसआयएसएफएस)
पुण्यात स्टार्टअप वाढण्याची कारणे -
- शहरातील तरुणांना नवकल्पना आहे
- तंत्रज्ञानाचा ॲक्सेस मोठ्या प्रमाणात
- सल्लागारांची संख्या जास्त आहे
- पुरेसे इनक्युबेटर उपलब्ध आहेत
- स्टार्टअपसाठी पायाभूत सुविधा आहेत
- पुण्यात स्टार्टअपसाठी कार्यशाळा देखील होतात
- स्टार्टअपमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे
- को- वर्किंग स्पेसची सुविधा
पुण्यात आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथील बरेचसे स्टार्टअप हे आयटी व तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. या स्टार्टअपसाठी लागणारे कौशल्य पुण्यातील तरुणांत मोठ्या प्रमाणात आहे. एवढेच नाही तर पुण्यात काही मोठ्या संस्था आहेत ज्या स्टार्टअप विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यासह पुण्यातील तरुणांमधील उद्योजकता देखील वाढली आहे. त्यामुळे येथील स्टार्टअपची संख्या वाढतच असल्याचे दिसते.
- डॉ. अनंत सरदेशमुख, स्टार्टअप व्यवस्थापन सल्लागार