स्वराज्य आणि परीक्षा

पुरंदरचा तह झाला. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाला भेटायला जाणे क्रमप्राप्त होते.
Chhatrapati shivaji maharaj
Chhatrapati shivaji maharajSakal

- प्रशांत सरुडकर

पुरंदरचा तह झाला. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाला भेटायला जाणे क्रमप्राप्त होते. त्यांनी एक पत्र सर्व किल्लेदारांना पाठवले. रात्रीच्या वेळी सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत किल्ल्याचे दरवाजे उघडू नयेत.

अगदीच गरज पडल्यास जिजाऊसाहेब, पंतप्रधान वा सरनौबत यांचे आदेश पाळावेत. मी आलो, तरी दरवाजा उघडू नका. महाराज ५ मार्च १६६६ रोजी राजगडावरून निघाले. सोबत संभाजीराजे आणि निवडक चारशे मंडळी होती.

जुन्नर परगण्यात मुक्काम होता. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर महाराज शांतपणे विचार करत होते, अर्थात स्वराज्याचाच. कसे होईल या स्वराज्याचे? ‘महाराज काळजी करू नका,’ चर्चा वाढत गेली. महाराज एकदम उभे राहिले आणि म्हणाले, ‘तुम्ही म्हणत असाल, तर घेऊ परीक्षाच, चला.’

आठ-दहा सरदार तयार झाले व सिद्धगड किल्ल्याकडे निघाले. आवाज ऐकून भिल्ल नाईक समोर आला, ‘‘कोण माणसं? कुठं निघालात?’’ असा प्रश्न विचारला. तेवढ्यात एका सरदाराने सांगितले, ‘‘महाराज आहेत, मुघलांशी तह मोडला, मुघलांचे सैनिक पाठी आहेत.

हे ऐकताच महाराजांना मुजरा करून किल्लेदारांना वर्दी दिली. किल्लेदार लगेच तयार झाला. महाराज किल्ल्याच्या दरवाजाजवळ येऊन थांबले. नगारखान्यात किल्लेदार उभा होते. तिथूनच त्यांनी मुजरा केला. सर्वांना तो सूचना देत होता.

महाराजांच्या लक्षात आले, की किल्ल्याच्या पायथ्याने सारे मशालजी गस्त घालतायेत. महाराजांनी आदेश दिला, ‘दरवाजा उघडा’ किल्लेदार शांतच. महाराज रागातच म्हणाले, ‘‘दरवाजा उघडता की नाही?’’ किल्लेदारांनी आदबीने विचारले, ‘‘महाराज आपल्याकडे आऊसाहेबांचे, पंतप्रधानांचे, अगर सरनौबतचे लेखी पत्र आहे का?’’

‘‘पत्र, या वेळी माझ्याकडे कुठून असणार? आता दरवाजा नाही उघडला, तर आपले मुंडके उडवले जाईल.’’ किल्लेदार ठामपणे म्हणाले, ‘‘महाराज सकाळी दरवाजा उघडला जाईल, परंतु तुमच्यापर्यंत मुघली सैन्य येणार नाही, याची दक्षता घेतली आहे.’’

सकाळी दरवाजा उघडला. दरवाजात किल्लेदार आणि किल्ल्यावरील सर्व अधिकारी मुजरा करत उभा होते. महाराज रागावून त्यांच्याकडे पाहत होते. थोडा वेळ गेला आणि महाराजांचा राग निघून गेला. महाराजांनी किल्लेदाराच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, ‘‘तुमच्यासारखे सवंगडी असल्यानंतर संपूर्ण राष्ट्र स्वराज्यात आणू.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com