मातीतील पाय मातीतच राहणार! Rahibai Popere | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahibai Popere
मातीतील पाय मातीतच राहणार!

मातीतील पाय मातीतच राहणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ’ची टीम कोंभाळणे (ता. अकोले) येथे पोचली, तेव्हा ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे घरासमोरील शेतात काम करीत होत्या. नातवाने त्यांना बोलाविले. ‘चला हापीसमध्ये’ म्हणत त्यांनी बीज बँक दाखविली अन् सुरू झाला मुक्त संवाद. ‘माझे मातीतील पाय मातीतच राहणार. मी नावाने मोठी झाले तरी शेतीचे नाते कधी सोडणार नाही, असे त्या सांगून गेल्या...

प्रश्न : पद्मश्री पुरस्कार मिळाला, काय भावना आहेत आपल्या?

राहीबाई : पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांच्यासह या पुरस्कार सोहळ्यासाठी दिग्गज उपस्थित होते. यापूर्वीही मला पुरस्कार मिळाले, तरीही पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने माझ्या कामाची दखल घेतली, त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या कार्याची ही पोचपावती आहे. माझ्या या वाटचालीत ‘बायफ’ संस्थेचा मोठा सहभाग आहे. त्यांची मी ऋणी आहे.

- पंतप्रधान आपल्याशी बोलले का? काय म्हणाले ते?

राहीबाई : यापूर्वी नारी शक्ती पुरस्काराच्या वेळी पंतप्रधान मोदी माझ्याशी बोलले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘काय सीडमदर, आता कसं काम चाललं आहे?’ त्यांना मी देशी बियांची बँक चालविली असल्याचे पूर्वी सांगितले होते. देशी-विदेशी पैशांच्या बँका तुम्ही बऱ्याच पाहिल्या, आता एकदा तरी देशी बियांची बँक पाहायला माझ्या गावाला या, अशी विनंती त्यांना केली होती. त्यावर ते म्हणाले होते, की मी एक दिवस नक्की येईन. यावेळीही ते माझ्याशी बोलले, तेही मराठीत. ‘एवढ्या पुरस्कारांत मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला काळ्या मातीच्या सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे,’ असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती कोविंद यांनीही, ‘तुमच्या कामाला सलाम’ असे म्हटले.

- देशी बियाणेसंग्रह व बीजविकासाचा प्रवास कसा झाला?

राहीबाई : देशी बियाणे व त्यांचा प्रयोग हे सर्व मी शेतकऱ्यांना दाखविले. मात्र, प्रारंभी लोक माझ्यावर टीका करायचे. नावं ठेवायचे. समाजासाठी काही तरी करायचे, असे लहानपणापासून वाटत असे. आपल्याला लिहिता-वाचता येत नाही, मग आपण समाजासाठी कसं काम करायचं, हा प्रश्न पडायचा. घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे काम करावे लागत असे. पुढे मुलाने दहावीनंतर शाळा सोडली. तोही कमवू लागला. मी ऊसतोडणी कामगारही होते. कारखाना बंद झाला की घरी येत असे. हाताला काही काम नसायचे. मग मी रोपे तयार करू लागले. हे काम पाच वर्षे केले. पुढे बचतगटातील महिलांना एक-दोन रोपे भेट द्यायचे. असा ‘श्रीगणेशा’ झाला.

- कोणत्या प्रकारची रोपं असायची?

राहीबाई : करवंदीची रोपं असायची. ही रोप पाहून लोक हसायचे. कारण, आमच्या इकडे करवंदाची झाडं खूप आहेत. पुढे बायफ संस्थेला जोडले गेले. त्यानंतर मी शेवगा, कढीपत्ता, हदगा, लिंबू, पपई, अशी रोपं तयार केली. त्यानंतर हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेऊ लागले. मात्र, वाण खरेदी करायला पैसे नसायचे म्हणून महिलांना रोपे देऊ लागले. अजूनही मी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेते. आता मात्र देशी रोपांच्या बियांची पाकिटे वाण म्हणून देते.

- सरकारकडून काय अपेक्षा आहेत?

राहीबाई : केंद्र असो, की राज्य सरकार; माझ्या कार्याची ते दखल घेत आहेत, याचा आनंद आहे. पण, आमच्या आदिवासी भागात चांगले रस्ते नाहीत, वीज-पाणी नाही. सरकारने किमान हे प्रश्न सोडविले पाहिजेत. वस्ती- वाड्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्याची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचे बियाणे द्यायला हवे.

- राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कोणता संदेश द्याल?

राहीबाई : मी माझ्या शेतात एक प्रयोग करून पाहिला. एकाच शेतात एका बाजूला भाताचे देशी बियाणे, तर दुसऱ्या बाजूला हायब्रीड बियाणे पेरले. एकाला सेंद्रिय खत टाकले, तर दुसऱ्याला रासायनिक. त्यातून एक लक्षात आले, की सेंद्रिय खत टाकले तिथे भाताचे पीक डोलू लागले. मात्र, जिथे रासायनिक खते टाकली, तेथे पिकांना धान्य आले नाही. हायब्रिडला बियाणे, रासायनिक खते व औषधे जास्त द्यावी लागतात. ती महाग असतात. एवढे करूनही बाजारभाव मिळाला नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी देशी बियाणे व सेंद्रिय खते वापरून शेती केली पाहिजे. काळ्या आईचे आरोग्य आपण जपले पाहिजे. शेतीचा पोत रासायनिक खतांनी खराब झाला, तर आपली पुढची पिढी चांगली जन्माला येणार नाही. आईचे आरोग्य चांगले असेल तरच बाळ चांगले जन्माला येते. जमिनीने चांगले अन्न दिले तरच आपली पुढची पिढी चांगली राहणार आहे. काळी आई आजारी पडली, तर तिला बरी करायला आपण कोणता डॉक्टर आणणार?

चंद्रकांत पाटील यांची मदत

माझं जुनं घर आपण पाहिलंच आहे. या घरात पहिली बीज बँक सुरू केली. माझी दखल पुढे सगळ्या जगाने घेतली. मी दुर्गम भागात जे काम करीत होते, ते पाहण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकदा हेलिकॉप्टरने आमच्या गावात आले होते. त्यांनी माझ्या कामाची माहिती घेतली. पुढे त्यांनी भरीव मदत केली. मला घर बांधून दिलं. आता येथे कार्यालय आहे. पाहुण्यांसाठी संवाद खोली आहे. भेट देणाऱ्यांसाठी रजिस्टर आहे. चंद्रकांत पाटील आपल्यावर उपकार आहेत, हे सांगण्यास राहीबाई विसरल्या नाहीत.

पद्मश्री सन्मान गाडीत विसरले !

पद्मश्री सन्मान पुरस्कार कसा आहे? तो पाहायला मिळेल का, या प्रश्‍नावर राहीबाई म्हणाल्या, ‘‘मी जेव्हा पद्मश्री पुरस्कार घेऊन घरी आले, तेव्हा घरच्यांनी जंगी स्वागत केले. प्रत्येकाचा आनंद ओसंडून वाहत होता. शिर्डीहून जी गाडी सोडायला आली होती, ती पुन्हा अकोल्याला गेली. त्या गाडीत माझा पुरस्कार विसरले. गाडीत पुरस्कार राहिल्याचे कळताच संबंधित वाहनचालकाला तो जपून ठेवण्याबरोबरच आणून देण्याचे सांगितले आहे. तो पुरस्कार सुरक्षित आहे. मला दोन दिवसांत मिळणार आहे.’’

loading image
go to top