
पाली : रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने सोमवारी (ता.14) धुमाकूळ घातला होता. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. सावित्री, आंबा व कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी देखील ओलांडली होती. मुंबई गोवा महामार्गावर चिकणी व खांब गावाजवळ पाणी साठले होते. तर भिसे खिंड रस्त्यावर दरड व झाडे कोसळली. काही ठिकाणी पुलावरून पाणी गेले तर महाड शहरात पाणी शिरले होते. धामणसे येथे अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली.