मान्सून अन्‌ विमा संरक्षण!

ओंकार भिडे
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

जनरल इन्शुरन्स कंपन्या या विविध प्रकारचे इन्शुरन्स देत असतात. पुरामुळे गाड्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळते का, हे आपण वाहनाचा संपूर्ण इन्शुरन्स काढला असल्यास तपासणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.

मा न्सूनमुळे महाराष्ट्राला; विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे झालेल्या विनाशाची स्थिती आता पुढे येत आहे. या पुरामुळे जीवित-वित्त व पशुधनहानी झाली. यातील मनुष्य व पशुधनहानी भरून न निघणारी अशीच आहे. पुरामुळे होणाऱ्या वित्तहानीचे नुकसान भरून काढण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतील; पण यापासून आपण कसे संरक्षण घेऊ शकू, हे पाहिले पाहिजे. 
सरकार व प्रशासन भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाय करील; पण आपण स्वतः काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याकडे होम इन्शुरन्स व घरातील मालमत्तेचा इन्शुरन्स उतरविण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळेच पूरप्रवण भागात राहणाऱ्यांनी वित्तहानी होऊ नये यासाठी इन्शुरन्स संरक्षण घेणे आवश्‍यक आहे. जनरल इन्शुरन्स कंपन्या या विविध प्रकारचे इन्शुरन्स देत असतात. पुरामुळे गाड्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळते का, हे आपण वाहनाचा संपूर्ण इन्शुरन्स काढला असल्यास तपासणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.

काय करावे?
पूर ओसरल्यावर पुरात पूर्ण बुडालेले वाहन लगेचच सुरू करू नये. कारण इंजिनमध्ये पाणी गेले असण्याची शक्‍यता असते. तसेच, बॅटरीने स्टार्टर दाबल्यावर हायड्रो-स्टॅटिकमुळे इंजिन खराब होण्याची शक्‍यता सर्वांधिक असते. अशा स्थितीत गाडी चालू केल्यास त्याला कॉन्सिक्वेशनल लॉस म्हणतात आणि याला इन्शुरन्स कव्हर नसते. त्यामुळे स्थिती पूर्ववत झाल्यावर गाडी आहे त्या ठिकाणीच राहू द्यावी. काही वेळा प्रशासन स्वच्छतेसाठी रस्त्यावरील वस्तू हलविते. अशा वेळी शक्‍य असल्यास गाडीचे फोटो; तसेच आजाबाजूची स्थिती दर्शविणारे (पुराचे परिणाम) फोटोही काढावेत.

स्वतः गाडी टो करून गॅरेजमध्ये घेऊन जावी आणि प्रोफेशनल मेकॅनिककडून गाडी तपासण्यास सांगावी. तसेच यानंतर वाहनाचा इन्सुरन्स एजंटकडून काढला असल्यास त्याला त्वरित फोन करावा. अथवा संबंधित कंपनीच्या टोल फ्री नंबरला फोन करून पुरामध्ये गाडी बुडाली होती आणि ती टो करून गॅरेजला आणली आहे, हे लवकरात लवकर सांगावे (कंपनीला आवश्‍यक असणारी सर्व माहिती देणे). अनेक कंपन्या टो चार्जेस घेत नाहीत; पण आपल्या पॉलिसीमध्ये कोणत्या अटी आहेत, हे तपासावे. इन्शुरन्स कंपनीचे ऑफिस जवळ असल्यास तेथे जाऊन क्‍लेम फॉर्म भरावा. तसेच नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर इन्शुरन्स क्‍लेम वाढत असतात. त्यामुळे अनेक गोष्टी स्वतःहून करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कंपनीला कळवल्यावर त्यांच्याकडून क्‍लेम पॉकेट नंबर घ्यावा.

आपत्कालीन स्थितीत इन्शुरन्स पॉलिसी न सापडल्यास कंपनीला आपण नाव, मोबाईल नंबर व पत्ता; तसेच ई-मेल सांगितल्यास कंपनीही आपल्याला या संदर्भात मदत करू शकते. इन्शुरन्स एजंटकडेही अनेक वेळा डुप्लिकेट कॉपी असते, हे लक्षात ठेवावे. बहुतेक जनरल इन्शुरन्स कंपन्या या पॉलिसीधारकास पोलिसी डॉक्‍युमेंट हे ई-मेलवरही पाठवत असतात. त्यामुळे आपल्या ई-मेलवरही हे चेक करावे.

गाडीला कशा प्रकारचे नुकसान झाले आहे, याची तपासणी इन्शुरन्स सर्व्हेअरकडून केली जाते व त्यानुसार क्‍लेम प्रक्रिया पूर्ण होते. झिरो डेप्रिसिएशन कव्हर असल्यास इन्शुरन्सअंतर्गत येणाऱ्या गोष्टीसाठी संपूर्ण कव्हर मिळू शकते. म्हणजेच कंपनी संबंधित बदलाचा खर्च देते. मात्र, असे नसल्यास पॉलिसीधारकाला खर्च सहन करावा लागतो. 
वाहनाची तपासणी झाल्यावर ते दुरुस्तीयोग्य नसल्यास टोटल लॉस म्हणून इन्शुरन्स कंपनीकडून जाहीर होते. पॉलिसीधारकास इन्शुअर्ड डिक्‍लेअर मूल्याप्रमाणे वाहनाचे पैसे मिळू शकतात. ही गोष्ट पूर्णतः कंपनीवर अवलंबून आहे. 

हे लक्षात घ्यावे 
अनेक वेळेला नव्या पॉलिसीमध्ये इंजिन प्रोटेक्‍टर कव्हर नसते. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती वा पाण्यात बुडाल्यामुळे इंजिन खराब झाल्यास त्याचा क्‍लेम इन्शुरन्स कंपनी देत नाही. या संदर्भात वाहन इन्शुरन्स तज्ज्ञ उदय नागनाथ म्हणाले, ‘इन्शुरन्स घेताना पॉलिसीधारकाने संपूर्ण गोष्टी जाणून घेणे आवश्‍यक आहे. पूरप्रवण भागात राहणाऱ्यांनी तर इंजिन प्रोटेक्‍शन आणि झिरो डेप्रिसिएशन असणारा इन्शुरन्स घ्यायला हवा. ज्यांच्याकडे सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारची कव्हर नसल्यास त्यांनी पॉलिसी रिन्यूअ करताना ही कव्हर असणारे रायडर घ्यावेत.’ कंपनीकडून पॉलिसी जारी झाल्यावर ती तपशिलाने पाहावी. तसेच त्यावर देण्यात आलेल्या नियम व अटी याही तपासून घ्याव्यात. यामुळे आपली फसवणूक झाली, असे म्हणावे लागणार नाही. आपल्याला सांगितलेल्या गोष्टींचे कव्हर त्यात नसल्यास आपण पॉलिसी पहिल्या सात दिवसांत परत करू शकतो आणि संबंधित पॉलिसीधारकास त्याचे पैसे परत मिळतात. 

या गोष्टी लक्षात ठेवा
  इंजिन पाण्यात बुडाले असल्यास 
गाडी बाहेर आल्यावर ती चालू करू नका.
  गाडी टो करा व गॅरेजला घेऊन जा, तपासून घ्या. 
 इन्शुरन्स कंपनी वा एजंटला त्वरित कळवा. 
  झिरो डेप्रिसिएशन व इंजिन प्रोटेक्‍शन कव्हर घ्या.
 वाहनाचा संपूर्ण इन्शुरन्स करा.
 पॉलिसी डॉक्‍युमेंट पूर्णतः वाचा, न वाचल्यास परत करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain and vehicle insurance