
पुणे - मॉन्सून पाऊस दमदार कोसळण्यास सुरुवात झाली आहे. कोकण, घाटमाथ्यासह राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. ११) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाची मुसळधार कायम आहे. तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र, मॉन्सूनचा दक्षिणेकडे सरकलेला आस, गुजरात पासून ते उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे. या हवामान प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा
गडचिरोली : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी या सूचनांमुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी मीना यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
कळसुबाईला पर्यटकांची सुटका
नाशिक : वरुणराजाने सुरगाणा, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा ३७ टक्क्यांपर्यंत पोचला असून गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा २७ टक्के होता. संततधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर, दारणा, पालखेड, कडवा धरणामधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी कृष्णावंती नदीला आलेल्या पुरात पर्यटक अडकले होते. राजूर पोलिस आणि स्थानिकांनी त्यांची सुटका केली. सलग तिसऱ्या दिवशी संततधार सुरु असल्याने गंगापूर समूह वगळता दारणा, कडवा, पालखेड आदी धरणांतून विर्सग सुरु झाला आहे.
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी संततधार पडलेल्या पावसाने मात्र रविवारी काहीशी उघडीप दिली. संपूर्ण ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. घाट माथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम असून पुढील तीन ते चार दिवस घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस जास्त पडला आहे.
विष्णुपुरी धरणातून विसर्ग
नांदेड ः नांदेड जिल्ह्यासह परिसरात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे विष्णुपुरी धरणातून रविवारी तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार बाभळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडे असल्याने नांदेडकरांचे पाणी तेलंगणमध्ये वाहून जात आहे. नांदेडकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
पावसाचा रेड अलर्ट
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली.
ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर
यलो अलर्ट
परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.