राज ठाकरे म्हणाले, आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य

अभय जोशी 
Wednesday, 11 November 2020

आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून, ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारकरी संप्रदाय "कार्तिक यात्रा समन्वय समितीच्या' शिष्टमंडळास आज दिले. 

पंढरपूर (सोलापूर) : आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून, ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारकरी संप्रदाय "कार्तिक यात्रा समन्वय समितीच्या' शिष्टमंडळास आज दिले. 

वारकरी संप्रदाय "कार्तिकी यात्रा समन्वय समिती' शिष्टमंडळाची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत "कृष्णकुंज' येथे बैठक पार पडली. आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने कोरोना पार्श्वभूमीवर परंपरांवर अनेक निर्बंध सोसत शासनास संपूर्ण सहकार्य केले होते; मात्र आता बाजारपेठांसह सर्व गोष्टी खुल्या होत असताना येत्या कार्तिकी यात्रेसाठी शासनाने निर्बंध लादू नयेत, याकरिता स्वतः संप्रदायाने कार्तिकी यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार यात्रा पार पाडावी, अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे संप्रदायाने केली होती. त्यास प्रतिसाद देत वारकरी संप्रदायाला चर्चेसाठी आमंत्रित करत संप्रदायाची कार्तिकी यात्रासंदर्भात समन्वयाची भूमिका राज ठाकरे यांनी समजून घेतली. 

या बैठकीस देवव्रत (राणा) महाराज वासकर, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज चवरे, रंगनाथ (स्वामी) महाराज राशीनकर, विठ्ठल महाराज चवरे, भरत महाराज अलिबागकर, भागवत महाराज हंडे, भरत महाराज अलिबागकर, श्‍याम महाराज उखळीकर आदींसह मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray said that the role of Warkari sect is appropriate in connection with the upcoming Karthiki Yatra