ठाणे : राज ठाकरेंनी मुलासह घेतला 'मामलेदार'चा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

राज ठाकरे यांनी कल्याणमधील जाहीर सभा संपवून मुंबईला जात असताना त्यांनी ठाण्यात मिसळवर ताव मारला. त्यांच्यासाेबत त्यांचा मुलगा देखील हाेता.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गेल्या काही निवडणुकांमधला परफॉर्मन्स बाजुला आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना असणारं वलय एका बाजुला, अशी परिस्थिती आहे. मुळात राज ठाकरे जे काही करतील त्याची बातमी होते. हे आधीही होतं आणि आजही आहे. काल, कल्याणमधील जाहीर सभा संपवून मुंबईला जात असताना त्यांनी ठाण्यात मिसळवर ताव मारला. त्यांच्या या मिसळ खाण्याचीही जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, कल्याण येथील सभा आटपून झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळची चव चाखली. राज ठाकरे यांचा हा मिसळ दौरा अचानक ठरला. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित आणि मनसेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. अचानक मामलेदार मिसळ खायला राज ठाकरे आल्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती.

विशेषतः तरुणांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे हॉटेल परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. हॉटेलमधील अनेक कर्मचारी आणि इतर ग्राहकांनी यावेळी राज ठाकरेंसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह केला. त्यालाही राज यांनी प्रतिसाद देऊन सेल्फी काढू दिले. मिसळ खाल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

राज ठाकरे यांना वाचनाची, फिरण्याची, खाण्याची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या शहरातील प्रसिद्ध खाण्याच्या ठिकाणांना ते अधून-मधून भेट देत असतात. मध्यंतरी पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा उल्लेखही त्यांच्या एका भाषणात आला होता. पुण्यात मित्रांना भेटायचं असेल तर मी वैशालीत भेटतो. तिथं डोसा खायला जातो, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं. आता राज यांनी ठाण्यातील मामलेदार मिसळला भेट दिल्यानंतर आता, या मिसळचीही ही जोरदार चर्चा होणार हे निश्चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray takes the taste of the misal with his son