Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

एरोमॉडेलिंग व्यवसायात अमिट छाप सोडणारे नागपूरचे एरोमॉडेलिंगतज्ज्ञ डॉ. राजेश जोशी यांनी सर्वात छोटे व हलके विमान तयार केले आहे.
Rajesh Joshi
Rajesh Joshisakal

नागपूर - एरोमॉडेलिंग व्यवसायात अमिट छाप सोडणारे नागपूरचे एरोमॉडेलिंगतज्ज्ञ डॉ. राजेश जोशी यांनी सर्वात छोटे व हलके विमान तयार केले आहे. त्यांच्या या अनोख्या विमानाची प्रतिष्ठेच्या इंडिया बुकसह आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. या सन्मानामुळे उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

डॉ. जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी ३० फूट उंच उडू शकणारे पाऊण ग्रॅमपेक्षाही (७७० मिलिग्रॅम) कमी वजनाचे रबर पॉवर्ड इनडोअर विमान तयार केले होते. आतापर्यंत भारतात व आशिया खंडात कुणीही अशाप्रकारचे छोटेखानी विमान तयार केले नाही.

त्यामुळे त्यांनी या विमानाची नोंद करण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे रीतसर अर्ज केला. त्यांच्या या विमानाची दोन्ही बुकमध्ये नोंद झाली असून, तसे प्रमाणपत्रही त्यांना मिळाले आहे. हा माझ्यासह तमाम नागपूरकरांसाठी फार मोठा बहुमान असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.

४२ वर्षांपासून एरोमॉडेलिंग क्षेत्रात

जोशी हे ४२ वर्षांपासून एरोमॉडेलिंग क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत पाऊण ग्रॅमच्या चिमुकल्या विमानापासून २१ फूट उंचीची व ६० किलो वजनाची विमाने तयार केली आहेत. विमानांनी अख्खे घर भरून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विमानांचे विविध प्रदर्शन, इव्हेंट्स व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सादर करून वाहवा मिळविली आहे.

अनेक मानसन्मान व पुरस्कार

६० वर्षीय राजेश जोशी यांना आतापर्यंत एरोमॉडेलिंगमध्ये अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना एकूण तीन सुवर्णपदके व दहा पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या नावाची सर्वात मोठ्या विमानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद करण्यात आली आहे.

एरोमॉडेलिंगचा प्रचार-प्रसार आवश्यक

डॉ. जोशी यांनी यावेळी एरोमॉडेलिंगच्या प्रचार व प्रसारावर भर दिला. ते म्हणाले, सध्याची युवा पिढी पूर्णपणे मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. त्यांना कौशल्यावर आधारित एरोमॉडेलिंगकडे वळविण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष दिल्यास या व्यवसायाला चांगले दिवस येऊ शकतात.

शिवाय तरुणाईच्या मनात एरोमॉडेलिंगबद्दल आकर्षणही वाढेल, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. डॉ. जोशी स्वतः अनेक तरुणांना मार्गदर्शन करून एरोमॉडेल घडवित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com