Video : शेतकऱ्यांसाठी आमदारकी स्विकारा; महाविकास आघाडीने नाही काम केले तर राजीनामा द्या...

Raju Shetty should decide to accept the MLA post for the farmers
Raju Shetty should decide to accept the MLA post for the farmers

सोलापूर : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ’एका विधानपरिषदेच्या जागेमुळे नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच’, असं म्हणत महाविकास आघाडीकडून देण्यात येणारी आमदारकी नाकरली आहे. मात्र, यावर कार्यकर्त्यांकडून त्यांनी किमान शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी उमेदवारी घ्यावी, अशी विनवणी केली जाऊ लागली आहे. 

हेही वाचा : ...तर आमदारकीची ही ब्याद आम्हाला नकोच...!
विधानपरिषदेवर राज्यपालांच्या कोट्यातून १२ जागा सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत. त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसनेनी स्थापन केलेल्या आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. त्यानुसार राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टी यांना उमेदवारी देण्यात येणार होती. त्यावर राजू शेट्टी यांनी होकार दर्शवला होता. त्यानंतर काहीजणांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या होत्या. त्यावर शेट्टी यांनी उमेदवारी नाकरण्याचा निर्णय घेतला. त्यावरही कार्यकर्ते नाराज झाले असून शेट्टी यांनी उमेदवारी स्विकारुन शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी काम करावे असे म्हटलं आहे. तर काही कार्यकर्त्यांनी आपण शेतकरी संघटनेबरोबर असल्याचे सांगत समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

कोणाचे काय मत....
अक्षय परदेशी यांनी म्हटलं की, शेट्टी यांनी आमदारकी स्विकारायला हवी. सरकार शेतकऱ्यांना योग्य न्याय देत नाही हे लक्षात येईल त्याक्षणी राजीनामा द्यावा. पण लोकहिताची आलेली संधी सोडू नये.
शेट्टी म्हणजे काय सदाभाऊ खोत नाही आहेत. सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसायला. पण यावेळी आमदारकीची संधी सोडू नये. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी आमदारकी स्विकारणे आवश्‍यक आहे.
जितेंद्र नरखडे यांनी म्हटलंय की, कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देऊ नये. नावं ठेवणारे तर देवाला पण ठेवतात. तुमचं कार्य नेटान सुरु राहू द्या. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सामान्य शेतकरी कायम तुमच्या बरोबर आहे...
सिध्देश्‍वर शिराळ यांनी म्हटलंय की, शेतकऱ्यांसाठी तुमची वरिष्ठ सभागृहात गरज आहे. कोण काय म्हणतयं याकडे लक्ष देऊ नका. 
रेमश पाटील यांनी म्हटलंय की, गेल्यावेळी भाजपने एक माणूस पळवला आता राष्ट्रवादीकडून. तुम्ही तुकच्या पक्षाचा आमदार निवडून आणावा. 
महेश करंबळी यांनी म्हटलंय की, विधानभवनात राजू शेट्टी यांच्या सारख्या लढवय्या नेत्याची गरज आहे. त्यामुळे संधी सोडू नये.
अम्रिश गमाटे यानी म्हटलंय की, शेट्टी इच्छुक नसले तरी, रविकांत तुपकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देऊ नये. याशिवाय राजू शेट्टी यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजू शेट्टी यांची भूमिका

शेट्टी यांनी फेसबुक पेजवरुन आमदारकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात म्हटलं की, राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. १२ जूनला डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.  इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरले. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिकाऱ्यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यानावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार यांना पक्षाचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह मी भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत. हे अत्यंत क्लेषकारक आहे.  २५ वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच... शेतककऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही.  स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com