घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नका, आमचंही लक्ष्य आहे - संजय राऊत

राज्यसभा निवडणूक : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSakal

मुंबई - राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची भिती महाविकास आघाडीला वाटते आहे. यासाठी आमदारांच्या हालचालींवर सूक्ष्म लक्ष ठेवले जात आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी घोडेबाजार करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, जसं केंद्राकडून तुमचं लक्ष असतं तसं महाराष्ट्राच्या गृह खात्याचं आणि मुख्यमंत्र्यांचे देखील लक्ष असल्याचा इशारा राऊत यांनी आमदारांसोबतच भाजपला देखील दिला आहे. तसेच राज्यसभेची निवडणूक झाली तर स्वागत आहे. नाही झाली तर अधिक स्वागत असल्याचे सांगितल्याने राज्यसभा निवडणुकीची सहावी जागा निवडून आणणे महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेचे राज्यसभेसाठीचे उमेदवार संजय पवार यांची दुसरी जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत, तीनपैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नसल्याचे सांगत महाविकास आघाडीला आव्हानच दिले आहे.

यांवर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले,की पीयूष गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. त्यांना महाराष्ट्राविषयी जपून भूमिका घ्यावी. महाराष्ट्रात विश्वासघाताची परंपरा नाही. या महाराष्ट्रात ती कोणी सुरु केली २०१४ आणि २०१९ मध्ये हे या राज्याची जनता जाणते. पीयूष गोयल हे बराच काळ दिल्लीला असतात त्यामुळे त्यांना इकडच्या घडामोडी फार माहीत नसतात, असेही त्यांनी नमूद केले. याचबरोबर, संसदीय लोकशाहीत अशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल होत असतात. जर त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे ते संख्याबळ आहे, तर निश्चितच त्यांना अधिकार आहे. आम्हाला वाटतं की,आम्ही जिंकू.

राऊतांचा संख्याबळाचा दावा

महाविकास आघाडीकडे जिंकण्यासाठी जेवढी मतं आवश्यक आहेत, ती आमच्याकडे आहेत. संपूर्ण गणित झाले आहे. मात्र या निवडणुकीत जर कोणी समजत असेल की इडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग देखील मतदान करू शकतात, तर मला माहीत नाही. मात्र इथले जे आमदार आहेत, मग ते अपक्ष किंवा लहान पक्षांचे असतील ते सर्वजण आमच्यासोबत आहेत, आमच्याकडे संपूर्ण संख्याबळ आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

घोडेबाजार होणार नाही : फडणवीस

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरचा भाजपचा उमेदवार निवडून येणार असून, या जागेसाठी कोणताही घोडेबाजार होणार नाही, असे फडणवीस आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरल्यानंतर म्हणाले. सहावी जागा निवडून आणण्यावर फडणवीस ठाम राहिले. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीच्या गोंधळानंतर शिवसेनेने कोल्हापूरमधील संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपनेही कोल्हापूरचे माजी खासदार महाडीक यांना उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूरमधील उमेदवारांवरून शिवसेना-भाजप यांच्यात नव्याने संघर्ष होण्याची शक्यता आहे.

आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील- नाना पटोले

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. निवडणुका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण विरोधी पक्षाने या परंपरेला तिलांजली दिली आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान होत असते, महाविकास आघाडीकडे बहुमत असून आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, देशाची एकात्मता मानणारा, त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार दिल्याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, पक्षात लोकशाही असून प्रतापगढी यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. एका तरुण आणि उत्साही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. राज्यसभा उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून जी चर्चा सुरु आहे ती निरर्थक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com