esakal | कोरोनाची लस येईपर्यंत वारकऱ्यांनी संयमाने घ्यावे; कार्तिकी वारी प्रतिकात्मक भरवावी : रामभाऊ चोपदार 
sakal

बोलून बातमी शोधा

Rambhau Chopdar

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस निरीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्तिकी वारी यंदा नकोच, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यासंदर्भात "सकाळ'ला सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यावर या प्रस्तावास श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी सहमती दर्शवली आहे. 

कोरोनाची लस येईपर्यंत वारकऱ्यांनी संयमाने घ्यावे; कार्तिकी वारी प्रतिकात्मक भरवावी : रामभाऊ चोपदार 

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस निरीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्तिकी वारी यंदा नकोच, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यासंदर्भात "सकाळ'ला सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यावर या प्रस्तावास श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी सहमती दर्शवली आहे. 

यासंदर्भात रामभाऊ चोपदार "सकाळ'शी बोलताना म्हणाले, की गेली नऊ महिने आपण सारे कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहोत. वारकरी संप्रदायाला मोठी झळ कोरोनाच्या संकटकाळात बसलेली आहे. आपण बऱ्याच महनीय व्यक्ती कोरोनामुळे गमावल्या आहेत. तसेच पंढरपूर, आळंदी येथील अनेक फडकरी, प्रमुख महाराज मंडळी व त्यांच्या कुटुंबीयांतील अनेकजण कोरोनामुळे बाधित झाले होते. परंतु माऊलींच्या कृपेने सर्वजण आज सुखरूप आहेत. कोरोना सावटाच्या दरम्यान पंढरपूर येथील चैत्री वारी फडकरी मंडळींनी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने निष्ठेने पार पाडली. आषाढी वारीच्या वेळेस आमचा प्रातिनिधिक पायी वारीचा आग्रह होता; परंतु शासनाने फक्त सात पालख्यांना थेट बसने परवानगी दिली. परंतु प्रत्यक्षात सातच्या 10 पालख्या कशा झाल्या, हे परमात्मा पांडुरंगास ठाऊक. त्या वेळेस काही वारकऱ्यांनी निष्ठेने पायी वारी पूर्ण केली, त्या ज्ञात - अज्ञात वारकऱ्यांच्या आम्ही संपूर्ण वारकरी संप्रदाय कायम ऋणात राहू. 

आता कार्तिकी वारी समोर येऊन ठेपली आहे. कोरोनाचे संकट कमी झाले आहे परंतु संपलेले नाही. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत वारकऱ्यांनी संयमाने घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील व्यक्ती कोरोनाने गमावणे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. माझे वडील वै. चोपदार गुरुजी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे आपल्या मोठी वारी करण्याच्या हट्टापायी एकही वारकरी बाधित करणे आपणाला परवडणारे नाही. त्यामुळे कार्तिकी शुद्ध वारी ही पंढरपूर येथील फडकरी मंडळी आणि सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांनी समस्त वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून पार पाडावी. 

तसेच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी तसेच पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांनी समस्त वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून पार पाडावी. यात्रा काळात मंदिरे पूर्णतः बंद ठेवावीत. प्रतिकात्मक वारीच्या शासन प्रस्तावाशी मी सहमत आहे. महाराष्ट्रातील अनेक सामान्य वारकऱ्यांची मते जाणून घेऊन मी माझी भूमिका आपल्या समोर मांडली आहे. हे माझे पूर्णतः वैयक्तिक मत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top