रत्नागिरी हापूस आता ‘अ‍ॅमेझॉन’वरही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 हापूस
रत्नागिरी हापूस आता ‘अ‍ॅमेझॉन’वरही

रत्नागिरी हापूस आता ‘अ‍ॅमेझॉन’वरही

रत्नागिरी : ऑनलाईन विक्री करणाऱ्या ‘ॲमेझॉन’ कंपनीने आंबा विक्री क्षेत्रातही प्रवेश केला आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरुवातही केली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र चालू केले असून, सुरुवातीला १२ शेतकऱ्‍यांकडून कंपनीने ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले.

रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी आणि इतर आंबा बागायतदार उपस्थित होते. हे ‘अ‍ॅमेझॉन’चे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. येथे आंबा बागायतदारांकडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुणे येथील ‘ॲमेझॉन’च्या ग्राहकांना पोहोचवला जाणार आहे. भविष्यात देशाच्या कानाकोपऱ्या‍त पोहोचवून निर्यातही केला जाणार आहे. आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरित पैसे दिले जाणार आहेत. उद्‌घाटनप्रसंगी जोशी म्हणाले की, ‘कोरोना ही बागायतदारांसाठी इष्टापत्ती ठरली आहे. अनेकांनी दलालावर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. अ‍ॅमेझॉनच्या रूपाने बागायतदारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. दर्जेदार आंबा कंपनीला दिला तर बागायतदाराला चांगला दरही मिळेल. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या थेट विक्रीसाठी येऊ लागल्यामुळे शेतकऱ्या‍‍ला दर ठरवता येणार आहे.’

हापूसला चांगला दर मिळवून देत असतानाच बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी आवश्यक खते, औषधे, साहित्य अ‍ॅमेझॉनकडून उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. पुढील वर्षी वेगळ्या पद्धतीने यावर काम करू.

- राजेश प्रसाद, प्रमुख व्यवस्थापक, अ‍ॅमेझॉन

आखातात ४० टक्के निर्यात

रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याचे ६५ हजार हेक्टर क्षेत्र असून दोन लाख १३ हजार मेट्रीक टन उत्पादन आहे. दोनशे कोटींपर्यंत उलाढाल दरवर्षी होते. रत्नागिरी हापूसला परदेशातही मागणी आहे. मुंबई, पुण्यात सर्वाधिक हापूसची विक्री होते. त्यापाठोपाठ अहमदाबाद, पश्‍चिम महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पुढे नाशिक, नागपूरसह अन्य जिल्ह्यात हापूसची विक्री होते. परराज्यांमध्ये दिल्ली, इंदूर, कोलकता, बंगळूर, राजनस्थानमध्ये काही प्रमाणात हापूस पोचला आहे. तर एकूण निर्यातीत सर्वाधिक ४० टक्के हापूस आखातात जातो. त्यापाठोपाठ युरोप, कुवेत, अमेरिका, जपानमध्येही निर्यात होते.

Web Title: Ratnagiri Hapus Alphonso Available Amazon Company Purchases Gardeners

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top