
वाचनसंस्कृती जोपासण्यास ‘पीडीएफ’ची मात्रा
मुंबई : ‘वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी पीडीएफ स्वरूपातील पुस्तके ऑनलाइन पद्धतीने मित्र-मैत्रिणींना द्यावीत,’ असे प्रकाशन व्यवसायावरच आसूड उगारणारे परिपत्रक मराठी भाषा विभागाने वाचनसंस्कृतीचा प्रसाराच्या निमित्ताने गुरुवारी काढले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने मराठी भाषा विभागाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक प्रकाशन व्यवसाय संपवणारा तर आहेच शिवाय कॉपीराइट आणि पायरेटेड कायद्याचे उल्लंघन करणारे असल्याने हे परिपत्रक मागे घेण्याची लेखक, प्रकाशकांची मागणी आहे.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी १५ ऑक्टोबर हा दिवस २०१५ पासून मराठी भाषा विभागातर्फे साजरा केला जातो. मात्र कोरोनाकाळात भेटण्यास मर्यादा असल्याने हा दिवस डिजिटल स्वरूपात साजरा करण्यावर भर दिला जावा, अशा स्वरूपाचे परिपत्रक विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी ‘वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पीडीएफ स्वरुपातील पुस्तके ऑनलाइन पद्धतीने मित्र मैत्रिणींना द्यावीत’ असे नमूद केले आहे. यावर लेखक आणि प्रकाशकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: वाट बघतोय रिक्षावाला..तीही शासनाच्या दीड हजाराची !
ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील म्हणाले की, या परिपत्रकानुसार ‘पीडीएफ’ पुस्तके देण्यास राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे. ‘पीडीएफ’ स्वरूपात पुस्तकांची देवाणघेवाण झाल्यास वाचन संस्कृती संपणार आहे. ही संस्कृती नसून विकृती असल्याच्या संताप त्यांनी व्यक्त केला. पायरसी करार, कॉपीराइट, बौद्धिक संपदा कायद्याचे उल्लंघन सरकारच करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष
अरुण जाखडे म्हणाले, जगभरात ‘पीडीएफ’च्या विरोधात लेखक, प्रकाशक आंदोलन करत असताना राज्य सरकारने अशा प्रकारे ‘पीडीएफ’ला प्रोत्साहन देऊ नये.’’ हे परिपत्रक मागे घ्यावी, अशी मागणी गणेश मतकरी, महेश केळुस्कर आणि मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता यांनी केली आहे.
‘पीडीएफ’ पुस्तकांमुळे मराठी प्रकाशकांचे नुकसान होत आहे. एक पुस्तक प्रसिद्ध करण्यामागे प्रकाशकाची मेहनत आणि भूमिका असते. ‘पीडीएफ’ला सरकारनेच अशा प्रकारे प्रोत्साहन दिल्यास कालांतराने प्रकाशक पुस्तके प्रसिद्ध करू शकणार नाहीत आणि वाचनसंस्कृती लयाला जाईल. यामुळे हे परिपत्रक मागे घेतले जावे.
- अरविंद पाटकर,मनोविकास प्रकाशन
Web Title: Reading Culture And Pdf
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..