मध्यावधी निवडणूकीला तयार रहा..! - एकनाथ खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले.

मुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले.
राज्यात विधानसभेच्या निवडणूका कदाचित डिसेंबर मध्येदेखील होवू शकतात, असे स्पष्ट विधान खडसे यांनी आज केले. डिसेंबरमध्ये मध्यावधी झाल्या नाहीत तर लोकसभे सोबत मात्र या निवडणूका नक्‍कीच होतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पक्षाच्या मुख्यालयात सुरू आहे. यावेळी मार्गदर्शन करताना खडसे बोलत होते.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजप सरकारचे काम अत्यंत प्रभावी सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपला बहुमत नसल्याने शिवसेनेच्या पाठिंब्यावर युती सरकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षाला बहुमत मिळेल या दृष्टीनेच प्रयत्न केले पाहिजेत. बुथ स्तरावर अत्यंत प्रभावी बांधणी करून पक्षविस्तार घराघरात पोहचवला पाहीजे, असे खडसे म्हणाले.

शिवसेना व भाजप मधे सतत तणावाचे वातावरण आहे. त्यातच भाजपला बहुमत नसल्याने युती सरकारमधे तडजोड करावी लागत आहे. अशा स्थितीत भाजपचा सध्याची विजयी मालिका पाहता मध्यावधी निवडणूका घेण्याची चाचपणी देखील सुरू आहे. मुख्यमंत्री ऐन कडक उन्हाळ्यात राज्यभरात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पाहणी व आढावा दौरा करत असले तरी पक्षाच्या स्तरावर मात्र थेट प्रचाराचीच तयारी सुरू आहे. अशा स्थितीत एकनाथ खडसे यांचे वक्‍तव्य म्हणजे राज्यात मध्यावधी निवडणूकांचे बिगुल वाजण्याची दाट शक्‍यता असल्याचे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ready for vidhansabha election