rohayo workers washim.jpg
rohayo workers washim.jpgmaharashtra

अर्रर्र..! निवडणूक काळात ‘रोहयो’च्या कामांवरील मजुरांमध्ये घट; दिवसाला अवघी 297 रुपयांचीच मजुरी; सुशिक्षित बेरोजगार निवडणुकीच्या प्रचारात दंग

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून १९८ तालुक्यांमधील एक हजारांहून अधिक महसूल मंडळांमध्येही विदारक स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाही ‘रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी होत आहेत, हे विशेष.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून १९८ तालुक्यांमधील एक हजारांहून अधिक महसूल मंडळांमध्येही विदारक स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाही ‘रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी होत आहेत, हे विशेष. एका महिन्यात नुसत्या सोलापूर जिल्ह्यातच दोन हजार मजूर कमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू असल्याने मजूर कमी झाले असावेत, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत दररोज सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या गावोगावी सभा होत आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यावेळी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा देखील नियोजित आहेत. त्या सभांना गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. दुसरीकडे आपल्या पक्षाचा जाहीरनामा घरोघरी पोच करणे, केलेली कामे प्रत्येकाला सांगणे, गावागावात पोस्टर चिकटवणे अशी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील अनेक तरुणांना, बेरोजगारांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

उमेदवारांची सभा असेल तेव्हा त्याठिकाणी गर्दी दिसावी म्हणून आवर्जून उपस्थित राहणे, वरिष्ठ नेत्यांच्या सभांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हजर राहणे, यासाठी दिवसाला अंदाजे ५०० रुपये मिळतात अशी चर्चा आहे. दुसरीकडे ‘रोहयो’च्या कामांवरील मजुरांना भर उन्हात काम करूनही दिवसाकाठी अवघी २९७ रुपयांची मजुरी मिळते. या पार्श्वभूमीवर ‘रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी झाले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे.

‘रोहयो’ कामांवरील मजुरांची स्थिती

  • तालुका २५ मार्च २३ एप्रिल

  • अक्कलकोट ७३६ ३३२

  • बार्शी १९९१ १६९१

  • करमाळा ८८२ १०४

  • माढा १९९० ४०४८

  • माळशिरस ११९ ११

  • मंगळवेढा ९०१ १७१

  • मोहोळ ९३८ ३०५

  • पंढरपूर १८१७ १३६६

  • सांगोला ८३९ २३६

  • दक्षिण सोलापूर १३७ २३०

  • उत्तर सोलापूर ११३ ०००

  • एकूण १०,४६३ ८,४९४

माढा व दक्षिण सोलापूर तालुका अपवाद

सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशी स्थिती संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. उजनी सध्या उणे ४१ टक्के असून शेतीसाठी धरणातून पाणी सोडता येत नाही, अशी सद्य:स्थिती आहे. जमिनीची पाणीपातळी खालावल्याने विहिरींचे पाणी खोलवर गेले असून काही विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांवर मजुरीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर एका महिन्यात माढा तालुक्यातील ‘रोहयो’च्या कामांवर दोन हजार ५८ तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ९३ मजूर वाढले आहेत. बाकीच्या सर्वच तालुक्यांमध्ये ‘रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com