अजितदादांना दिलेला नकार, माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक 

प्रमोद बोडके
Monday, 7 September 2020

आठवलेंच्या समोर गेल्यावर बसला धक्का 
भाजपच्या कोट्यातून माळशिरस मतदार संघ रिपाइंला सोडणार असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर मी रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी आठवले यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना मोबाईलवरून माझ्या उमेदवारीबद्दल विचारणा केली. आठवले यांनी त्यांच्या दूरध्वनीचा स्पीकर ओपन केला होता. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी उमेदवारीसाठी डॉ. विवेक गुर्जर यांच्या नावाचा उच्चार केल्याने मला सर्वांत मोठा धक्का बसल्याची माहितीही संकल्प डोळस यांनी दिली. 

सोलापूर : अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या माळशिरस (जि. सोलापूर) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. तुला चांगली मते मिळतील आणि तू निवडूनही येशील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. माझ्या वडिलांना मोहिते-पाटील घराण्याशी निष्ठा कायम ठेवली. आपणही तीच निष्ठा कायम ठेवावी म्हणून मी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या संपर्कात होतो. मोहिते-पाटील यांनी मला तसा शब्दही दिला होता. माळशिरसमधून भाजपच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाचा उल्लेखही झाला नाही. अजित पवारांना त्यावेळी मी दिलेला नकार ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याची कबुली माळशिरसचे तत्कालीन आमदार कै. हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी कबूल केली आहे. 

आमदार असतानाच वडिलांचे अकाली निधन झाले. वडील हयात होते तोपर्यंत माझा आणि राजकारणाचा फारसा काही संबंध नव्हता. वडिलांच्या जाण्याने मला राजकारणाकडे यावे लागले. राजकारणाच्या सुरवातीला मोठा धडा आपल्याला शिकायला मिळाला. आयुष्यात एकदा झालेली चूक पुन्हा करणार नाही. आता आयुष्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच एकनिष्ठ राहणार असल्याचेही संकल्प डोळस यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी माळशिरसमधून तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्‍य दिले. माझे वडील मोहिते-पाटील यांच्याशी व निष्ठा ठेवून होते. त्यामुळे राखीव माळशिरस मतदार संघामधून माझ्या नावाचा विचार होईल अशी मला अपेक्षा होती. माझा अपेक्षा भंग झाला. उमेदवारीसाठी त्यांनी माझे नावे साधे चर्चेत देखील घेतले नसल्याची खंत संकल्प डोळस यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादीने दिली युवकच प्रदेश सरचिटणीसची जबाबदारी 
संकल्प डोळस यांना काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने युवक आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे काम करत असतानाच आपण आगामी काळातही माळशिरस विधानसभा मतदार संघात सक्रिय राहणार असल्याचा निर्धार संकल्प डोळस यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The refusal given to Ajit Pawar is the biggest mistake of my life