esakal | उभं तर राहायचंच, फक्त लढ म्हणा!
sakal

बोलून बातमी शोधा

representative reaction of young people villagers and sarpanchs in Khidrapur

‘‘आम्हाला चिखल-मातीतून उभं राहावंच लागेल. आता इतक्‍या सगळ्यांनी आम्हाला मदत पाठवलीय. ती महिनाभर सहज पुरेल. आता तुम्ही फक्त लढ म्हणा,’’ ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे खिद्रापूर(ता. शिरोळ)मधील तरुणाई, ग्रामस्थ आणि सरपंचांची.

उभं तर राहायचंच, फक्त लढ म्हणा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे-  ‘‘आम्हाला चिखल-मातीतून उभं राहावंच लागेल. आता इतक्‍या सगळ्यांनी आम्हाला मदत पाठवलीय. ती महिनाभर सहज पुरेल. आता तुम्ही फक्त लढ म्हणा,’’ ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे खिद्रापूर(ता. शिरोळ)मधील तरुणाई, ग्रामस्थ आणि सरपंचांची.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हजारो लोकांचे संसार महापुरामुळे वाहून गेले. तनिष्का व्यासपीठाच्या राज्यभरातील सदस्या पूरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंचा संच काही गावांत उत्स्फूर्तपणे आजतागायत पुरवत आहेत. शिवाय सकाळ रिलीफ फंडासाठी निधीही देत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील तनिष्का सदस्यांनी जीवनावश्‍यक वस्तूंचे संच तयार केले. त्यात पुणे शहरातील तनिष्का सदस्यांप्रमाणेच जिल्ह्यातील सदस्याही आघाडीवर होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत मदतीचे नियोजन, जमवाजमव झाली. नातेवाईक, परिचितांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात तनिष्का यशस्वी ठरल्या. बघता बघता दोन दिवसांत  सुमारे सहाशे संच जमा झाले. शिवाय कणिक, ब्लॅकेट, सॅनिटरी नॅपकीन, झाडू, साड्याही दिल्या. कपडे नवेच देण्याकडे सगळ्या जणींचा कटाक्ष होता. पुण्याप्रमाणेच नाशिक, सातारा, जळगाव, मुंबई, यवतमाळ येथील तनिष्का गेले तीन आठवडे मदतकार्यात हिरिरीने सहभागी झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील तनिष्कांनी जीवनावश्‍यक वस्तूंचा एक ट्रक पूरग्रस्तांसाठी पाठवला. यवतमाळमधील सदस्यांनी लहान मुलांसाठी मदत केली.  

‘सकाळ’च्या कोल्हापूर कार्यालयाच्या माध्यमातून खिद्रापूरमध्ये मदतीची गरज आहे, हे लक्षात आल्यानंतर तिथे तनिष्का टीमने जीवनावश्‍यक वस्तूंचे संच घराघरांत दिले. सरपंच हैदरखान दस्तगीरखान मोकाशी यांनी मदतवाटपाच्या कामासाठी रवी पाटील या तरुणाच्या नेतृत्वाखाली आठ-दहा कार्यकर्त्यांचा गट जोडून दिला. मग चार, पाच तास मदतवाटपाचे काम जसे झाले, ‘आम्ही खिद्रापूरवासी कष्टाळू शेतकरी, दुग्ध व्यावसायिक आहोत. आम्हाला इतकीही मदत देऊ नका, ज्यामुळे काम करण्याची आमची इच्छा संपेल. आम्हाला उभं राहिलंच पाहिजे,’ ही दत्त साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील यांची जिद्द बरेच काही सांगणारी आणि प्रातिनिधिकही. 

अजूनही काही गावांत मदत मिळाली नसल्याचे कळताच तनिष्का सदस्या पुन्हा पुन्हा आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे येत आहेत. राधानगरीतील फेजीवडे, शिरगाव, सांगलीतील अंकली या गावातील तनिष्का सदस्यांनी मदतीची गरज आहे, असे समजल्यानंतर लगेच मदतीचा हात दिला.

‘आम्हाला नको; त्यांना जास्त गरज...’
नरसोबाची वाडीतील तनिष्का सदस्या वृंदा कुलकर्णी यांचे घरही पाण्यात होते. नाईलाजाने त्यांनी मुलांसह कोल्हापूर गाठले. कोणकोणत्या गावांना तनिष्कांची मदत पाठवायची, हे विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘दत्तगुरूंमुळे आमच्या गावाला मदत मिळतेय. तुम्ही दुसऱ्या गावांत जा. ज्यांच्यापर्यंत काही पोचलं नाही, अशा लोकांना द्या.’’ आता वृंदाताईंसारख्या तनिष्का परिसरातील महिलांच्या अडचणी जाणून, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

loading image
go to top