पांढरकवड्याजवळील `त्या‘  वाघिणीला जेरबंद करा 

राजेश रामपूरकर
Tuesday, 22 September 2020

टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढली आहे. या अभयारण्याच्या सभोवताली अनेक गावे असून वाढलेली वाघ अधिवास शोधण्यासाठी भटकंती करतात. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागले आहेत. १९ सप्टेंबरला अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई दडांजे या शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघिणीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. यापूर्वी शेतात काम करणाऱ्या सुभाष कायतवार याचा वाघिणीने पाठलाग केला.

 
नागपूर, ता. २१ ः यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात अधिवासाच्या शोधात निघालेल्या (टी २ सी १) या वाघिणीने अंधारवाडी येथील शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून ठार केले. यापूर्वीही त्या वाघिणीने दोन व्यक्तीवर हल्ले केले होते. भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी आज ‘त्या‘ वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढली आहे. या अभयारण्याच्या सभोवताली अनेक गावे असून वाढलेली वाघ अधिवास शोधण्यासाठी भटकंती करतात. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागले आहेत. १९ सप्टेंबरला अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई दडांजे या शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघिणीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. यापूर्वी शेतात काम करणाऱ्या सुभाष कायतवार याचा वाघिणीने पाठलाग केला. प्रसंगावधान ओळखून झाडावर चढल्याने त्याचा जीव वाचला. विठोबा वगारहांडे या शेतकऱ्यावरही असाच बाका प्रसंग आला होता. 

महाविद्यालयांना दिलासा मिळेल काय? ४० टक्केच प्रवेश; विद्यार्थ्यांचा नामवंत महाविद्यालयांकडे कल

या वाघिणीने अंधारवाडी, पाटणबोरी, वाऱ्हा परिसरात पशुधनावर हल्ला करून शिकार केली आहे. काही वर्षांपूर्वी सुन्ना गावाजवळ वाघ नेहमीच पशुधनाचा फडशा पाडत असल्याने विष टाकून मारण्याची घटना घडली होती. टिपेश्‍वरच्या पायथ्याशी असलेल्या पारवानजीक फासा टाकून वाघाला मारण्यात आले होते. पांढरकवडा वनविभागात अंतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्‍यात टी १ या अवनी वाघिणीने १३ लोकांचा जीव घेतला होता. त्या वाघिणीला तत्कालीन वनमंत्र्यांच्या सूचनेनुसार बोलवलेल्या शिकाऱ्यांनी तिचा जीव घेतला होता हे विशेष. 

व्वा...कोरोनाकाळातही नागपूरचे बुद्धिबळपटू ऑनलाइन स्पर्धांमध्ये व्यस्त

टिपेश्‍वर परिसरात वाघ व मानव असा संघर्ष नेहमीच निर्माण होत आहे. हा संघर्ष टाळून वाघांचा नागरी वस्तीत प्रवेश होऊ नये, वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत बैठक झाली होती. वाघ नागरीवस्तीत प्रवेश करणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गस्ती करण्यात येत आहे. वन्यजीव प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार वाघाला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्‍यू टीम व विशेष व्याघ्रसंरक्षण दल वाहनासह तैनात करण्यात आले आहे. नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे पिंजरा असलेला वाहनही वाघिणीला आणण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rescue Tigress in Yavatmal District