सह्याद्री खंडातील अप्रकाशित श्‍लोकांचे संशोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Research of Unpublished Verses

सह्याद्री खंडातील अप्रकाशित श्‍लोकांचे संशोधन

नाशिक : श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवती मूर्ती संवर्धनाच्या कामावेळी स्कंद पुराणातील सह्याद्रि खंडातील अप्रकाशित श्‍लोकांचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे संवर्धनाच्या कामात धार्मिक विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे शांतारामशास्त्री भानोसे यांनी अप्रकाशित श्‍लोकांचे संशोधन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी देशभरातील ग्रंथालयांमधून हस्तलिखितांचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी देशातील विद्वानांना सोबत घेऊन ते अभ्यास करत आहेत.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाचे १४ हजार श्‍लोक आहेत. त्यातील ७ हजार श्‍लोकांचे वाडःमय प्रकाशित आहे. मात्र उर्वरित ७ हजार श्‍लोक अद्याप अप्रकाशित आहेत, असे सांगून भानोसे म्हणाले, की मुळातच, पुराण आणि संत वाडःमयात भगवतीचे माहात्म्य उपलब्ध आहे. मात्र स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात सप्तशृंग माहात्म्य या नावाचे दोन अध्याय असल्याची नोंद मिळते.

प्रत्यक्षात हे दोन अध्याय प्रकाशित झालेले नाहीत. पण दोन अध्यायातील निवड श्‍लोक श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या संबंधाने भक्तांच्या उपासना परंपरेत मिळतात. ते श्‍लोक असे :

तत्तीर निकटे सप्तशृंगाख्य: पर्वतोत्तम:।

सह्यस्य शकलं यत्र स्थिता भगवती सदा।।

महिषाख्यं महादैत्यं महादैत्यसमान्वितम।

हत्वा सर्वान दुष्टदैत्यान। स्थितिं तत्र चकार सा।।

अष्टदशभुजा दुर्गा सिंहवानसंस्थिता।

भक्तानुक्पासम्पूर्णा हृदयानंदवर्धिनी।।

अर्थात, गिरिजा (आताची गिरणा) नदी जवळील सह्याद्री पर्वतरांगेतील सप्तशृंग नावाचा श्रेष्ठ पर्वत आहे. या पर्वतावर भगवतीचा निवास आहे. अनेक राक्षसांसह दुष्ट महिषासुराचा वध करून भगवतीने इथे भक्तांसाठी निवास केला आहे. अष्टादशभूजा म्हणजे, १८ हातांतील अस्त्र-शस्त्रांच्या आयुधांनी सज्ज असलेल्या आणि सिंहावर आरूढ भगवतीला भक्तांविषयी अपार माया आहे. भक्तांविषयी दया आहे. भक्तांच्या अंतःकरणातील आनंद वृद्धींगत करणारी भगवती आहे.

दरम्यान, सह्याद्रि खंडातील दोन अध्याय उपलब्ध झाल्यास श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवतीची माहिती, उपासना पद्धती ही भक्तांसाठी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

काशीमध्ये होतो धर्मशास्त्राचा निर्णय

विविध तंत्र ग्रंथ सुद्धा हस्तलिखित स्वरूपात अप्रकाशित आहेत. तसेच प्रकाशित झालेले तंत्र ग्रंथ हे पूर्ण नाहीत. त्यामुळे प्रकाशित साहित्यातून आपल्याला तर्क लावता येत नाही, असे सांगून भानोसे म्हणाले, की काशीच्या श्री गीर्वाण वाग्वर्धिनी सभाचे अध्यक्ष पंडित गणेश्‍वरशास्त्री द्रावीड त्यांच्याकडे अनेक हस्तलिखित आहेत. या सभेकडे धर्मशास्त्र विषयक प्रश्‍न विचारून त्यावर निर्णय घेतले जातात. त्यामुळे शंका अथवा प्रश्‍न असल्यास काशीच्या सभेकडे लेखी स्वरूपात देऊन त्याबद्दलची माहिती विचारता येईल. जम्मूची लायब्ररी, बडोदा येथील ओरिएंटल लायब्ररी, दक्षिण भारतातील त्रावणकोरचे ग्रंथालय, कोलकोतामधील आशिया सोसायटी आदी ठिकाणी हस्तलिखित आहेत काय? याची माहिती घेतली जात आहे.

Web Title: Research Of Unpublished Verses Shree Saptashrungi Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..