
Ajit Pawar: '...खोके घेतले असतील तर मी...', त्या वक्तव्यावर पवार संतापले
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप हे चित्र काही नवीन नाही. अशात शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार अर्थमंत्री असताना ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नव्हते असा आरोप केलाय. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार प्रतिउत्तर देताना म्हणाले की, 'कृपाल तुमाणे यांनी सांगितलं राज्यातील आणखी एका व्यक्तीने सांगावं मी पैसे घेतले म्हणून तर मग मी राजकारण सोडेन. उगाच माझ्यावर आरोप करायचे नाहीत. त्यांनी पुरावे नाही दिले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि घरी बसावं लागेल, उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला'.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'एकाकडून जर मी पैसे घेतले असतील तर राजकारण सोडेन. आम्ही समोरासमोर उभं राहतो. मी पैसे घेतले असल्याचे पुरावे नाही मिळाले तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन घरी बसावं. तुम्ही इतर नेत्यांना विचारा माझ्या कामाची पद्धत काय आहे'.
सध्या राज्यातील सरकारची जाहिरातबाजी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. तर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी रेटकार्ड आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील रेट कार्ड देखील समोर आणलं होतं. काही दिवसांपूर्वी या संपूर्ण बातम्या मी पेपरमध्ये पहिल्या. तर राज्यातील अनेक मोठे सनदी अधिकारी हे बढत्या नको म्हणतात, कारण त्यांना नको ती कामे करावी लागतात, असं अजित पवार म्हणाले आहेत.