रिक्षा संप स्थगित;  उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

राज्यभरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणारा रिक्ष संप स्थगित करण्यात आला आहे.

मुंबई -  राज्यभरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणारा रिक्ष संप स्थगित करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 9) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रिक्षा चालक-मालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. त्यामुळे संप स्थगित केल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील 20 लाख रिक्षा चालक-मालक संपात सहभागी होणार होते. महामुंबई परिसरात मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा असल्याने मोठा पाऊस झाल्यास नागरिकांचे हाल झाले असते. भाडेवाढ, ओला-उबर आदी ऍप आधारित टॅक्‍सीसेवा बंद करा, रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा आदी मागण्यांसाठी राज्यव्यापी रिक्षा संप पुकारण्यात आला होता. याबाबत सोमवारी प्रधान सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासोबत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला नाही; त्यामुळे संपाचा निर्णय कायम असल्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिल्यावर संप स्थगित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी दुपारी 3 वाजता बैठक होईल. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला आहे.
- शशांक राव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक-मालक संघटनांची संयुक्त कृती समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rickshaw driver strike Postponed Tomorrow CM Meeting