शाळांच्या अनुदानासाठी बिंदूनामावली तपासणीची धडक मोहीम 

संतोष सिरसट 
Tuesday, 7 July 2020

चालढकल होत असल्याची शिक्षकांमध्ये भावना 
शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. मात्र, आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. काही तरी कारण पुढे करून हा विषय टाळला जात असल्याची भावना या शाळेवर काम करणाऱ्या शिक्षकांची झाली आहे. 20 टक्‍क्‍यांचे अनुदान सुरू करताना बिंदूनामावलीची तपासणी मागासवर्ग कक्षाकडून करुन घेतली आहे. मात्र, पुन्हा तीच अडचण पुढे करून केवळ चालढकल करण्याचा शासनाचा हा प्रयत्न असल्याची भावना या शिक्षकांची झाली आहे. 

सोलापूर ः राज्यातील शाळांना 20 टक्के व 40 टक्के अनुदान देण्यासंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी दोन महिन्यांच्या आता राज्यातील या शाळांची बिंदूनामावली (रोस्टर) तपासून पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बिंदूनामावली तपासणीची धडक मोहीम कार्यक्रम राबविण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. 

राज्यातील शाळांना 20 टक्के अनुदान दिले जाते. काही शाळा अनुदानास पात्र घोषित केल्या आहेत. सध्या 20 टक्के अनुदान घेणाऱ्या शाळांना वाढीव 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. यासंदर्भात नुकतीच श्री. पवार यांच्याकडे वित्त विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक शाळांची बिंदूनामावली अद्ययावत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या सगळ्याच शाळांनी बिंदूनामावली पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत श्री. पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिकचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी पत्र काढून शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना बिंदूनामावली तपासणीच्या सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. पुणे येथील मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामावली तपासणीसाठी धडक मोहीम कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील दोन महिन्याच्या कालावधीत ही तपासणी पूर्ण करण्यासही त्यांनी सांगितले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roster campaign for school grants