esakal | भारतातल्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. मोहन भागवत

भारतातल्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मुंबई : भारतात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच असून येथे इस्लामचा प्रवेश झाला तो परकीय आक्रमकांमुळे, असे नमूद करत मुस्लिम धर्मातील कट्टरपंथीयांनी बदलावे, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी आणि देशाची गौरवशाली परंपरा आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत, असे मानतो. कोणाच्याही मताचा येथे अनादर होणार नाही. परंतु आपणास मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे तर भारतीय वर्चस्वाचा विचार करावा लागेल. राष्ट्रहितास प्राधान्य देऊन त्यादिशेने अग्रेसर होण्याकरिता सर्वांना सोबत पुढे जावे लागेल, असेही ते म्हणाले.

ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशन या पुणेस्थित संस्थेद्वारे मुंबईत आयोजित ‘राष्ट्र प्रथम– राष्ट्र सर्वतोपरी या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी मंचावर केरळचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान व काश्मीर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू ले. जन. (नि.) सय्यद अता हसनेन यांनी आपले विचार मांडले.

यावेळी बोलतना सरसंघचालक म्हणाले की, परकी आक्रमकांसोबत इस्लाम भारतात आला, हाच इतिहास आहे आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे. मुस्लिम समाजातील विवेकी नेतृत्वाने आततायी गोष्टींचा विरोध करायला हवा. कट्टरपंथियांसमोर त्यांना आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. हे कार्य निरंतर करावे लागेल. आपल्या सर्वांसाठी हा खडतर परीक्षेचा काळ आहे. जेवढ्या लवकर आपण हे कार्य आरंभ करू, तितकेच आपल्या समाजाचे नुकसान आपण टाळू शकू. भारत भविष्यात महाशक्ती होईल, ते इतरांना घाबरविण्यासाठी नाही. तर तो विश्वगुरूंच्या स्वरूपात विराजमान होईल.

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान म्हणाले की, विश्वातील विविधतेला ज्या ज्या ठिकाणी बाधा निर्माण केली गेली, त्या सर्व ठिकाणी भयंकर संकटांना तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. याउलट ज्या ज्या ठिकाणी ही विविधता जपली गेली, तो समाज संपन्न असल्याचे आपण पाहू शकतो. भारतीय संस्कृतीत कुणालाही परके मानलेले नाही. कारण येथे सर्व समान आहेत.

loading image
go to top