Breaking! दसऱ्यानिमित्त रविवारीही सुरु राहणार आरटीओ कार्यालय 

तात्या लांडगे
Friday, 23 October 2020

ठळक बाबी... 

  • कोरोना काळातही शनिवारी व रविवारी सुरु आहे ड्रायव्हिंग टेस्ट 
  • वाहनचालकांना तत्काळ वाहनाचा ताबा मिळावा म्हणून रविवारीही नवीन गाड्यांचे पासिंग 
  • दर शनिवार, रविवारीही दिला जातोय पक्‍का व शिकाऊ वाहन परवाना 
  • सुट्ट्यांदिवशी काम करण्यासाठी आहेत सहा मोटार वाहन निरीक्षक व 18 लिपीक 

सोलापूर : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. दसऱ्याच्या दिवशी अशा नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनांचा ताबा मिळावा, या हेतूने आरटीओ कार्यालये रविवारी (ता. 25) सुरु राहणार आहे.

 

कोरोनामुळे किमान अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासकीय कार्यालयांमधील कामकाज पाहिले जात आहे. मात्र, दसऱ्याच्या दिवशी अनेकजण वाहनांची खरेदी करतात. त्या वाहनधारकांना तत्काळ वाहनाचा ताबा मिळावा, परिवहन विभागाला त्यातून मोठा महसूल मिळणार आहे. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील सर्वच प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालये सुरु ठेवावीत, त्यासाठी पुरेशा प्रमाणात अधिकारी तथा कर्मचाऱ्याचीं उपलब्धता असावी, असे आदेश परिवहन उपायुक्‍त जितेंद्र पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे व अकलूज विभागाच्या परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रविवारीही कार्यालय सुरु राहील, असे स्पष्ट केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकीची खरेदी होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

 

ठळक बाबी...

  • कोरोना काळातही शनिवारी व रविवारी सुरु आहे ड्रायव्हिंग टेस्ट
  • वाहनचालकांना तत्काळ वाहनाचा ताबा मिळावा म्हणून रविवारीही नवीन गाड्यांचे पासिंग
  • दर शनिवार, रविवारीही दिला जातोय पक्‍का व शिकाऊ वाहन परवाना
  • सुट्ट्यांदिवशी काम करण्यासाठी आहेत सहा मोटार वाहन निरीक्षक व 18 लिपीक
  •  

वाहन खरेदीत होईल वाढ 
दसऱ्यानिमित्त दरवर्षी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. या पार्श्‍वभूमीवर यंदा वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्‍वास आहे. त्यानिमित्ताने रविवारीही कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The RTO office will also be open on Sunday