

Solapur ZP
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी श्वानदंश प्रतिबंधक (रेबीज) लसीच्या उपलब्धतेचा मुद्दा चांगलाच गाजला. आरोग्य केंद्रांमध्ये श्वानदंश झालेल्या रुग्णांना लस मिळत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, ‘रेबीज लसीच्या एका व्हायलमधून पाच डोस दिले जातात. एकाच रुग्णाला लस दिल्यास उर्वरित डोस वाया जात असल्याने पाच रुग्ण एकत्र आल्यावरच लस देणे शक्य होते,’ असे स्पष्टीकरण दिले. या उत्तरावर संतप्त झालेल्या सदस्यांनी, ‘लस वाया गेली तरी चालेल; पण माणसाचा जीव वाचला पाहिजे. श्वानदंश झालेल्या कोणत्याही रुग्णाला लसीअभावी परत पाठवू नका,’ अशी ठाम भूमिका मांडली. यापुढे श्वानदंशग्रस्तांना तातडीने रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश समितीने आरोग्य विभागाला दिले.
स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांच्या साठवणुकीचाही प्रश्न ऐरणीवर आला. शासकीय रुग्णालयाच्या औषध भांडारात जागेअभावी अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. आषाढीसाठी सुमारे दहा कोटींची औषधे खरेदी करण्यात आली; मात्र ती साठविण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीची उपलब्ध जागा शोधून तेथे स्वतंत्र औषध भांडार उभारण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील बैठकीपर्यंत जागा निश्चित करण्याचे आदेश उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, ग्रामीण आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, आपत्कालीन आरोग्य सेवा तसेच विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या गोलमोल उत्तरांवर सदस्यांची नाराजी
बैठकीत विविध विषयांवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘विचारलेल्या प्रश्नांना थेट आणि स्पष्ट उत्तरे द्या. गोलमोल उत्तरे देऊ नका,’’ असा इशारा सदस्यांनी दिला. आरोग्य व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उत्तरांवर अध्यक्षांसह अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मुंबईला गेल्याने ते बैठकीला अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.