पीएमसी बँकेच्या बाहेर गर्दीच गर्दी; अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

ही बँक डब-घाईला आल्याची अफवा पसरल्याने खातेदारांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्रभरातील पीएमसी बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली असून गोंधळ उडाला आहे.

मुंबई : आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

पीएमसी बँकेला आरबीआयच्या कलम 35 ए अंतर्गत नियमक बंधनात आल्याने सर्व खाते धारकांचे आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे फक्त एक हजार रुपये एका महिन्यात काढ़ता येणार आहे.तर कर्ज देखील आता मिळणार नाही.  त्यामुळे या बँकमध्ये खाते असणारे नागरिक घाबरले आहेत. बँकेची सेवा पूर्ववत होण्याकरिता सहा महिने लागणार आहेत अशी माहिती बँकेचे अधिकारी देत आहेत.

ही बँक डब-घाईला आल्याची अफवा पसरल्याने खातेदारांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्रभरातील पीएमसी बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली असून गोंधळ उडाला आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 8 येथील शाखेत खाते धारकांनी गर्दी केली आहे.

जीटीबी नगर शाखेतही खातेदारांची गर्दी भरपूर गर्दी झाले आहे. ठाण्यातील किसननगर येथील पीएमसी बँकमध्ये नागरिकांची गर्दी झाली आहे. आपले पैसे परत मिळणार की नाही या भीतीने नागरिकांनी बँकेला घेराव घातला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड,स्थानिक नगरसेवक राम रेपाळे,योगेश जानकर आदी पक्षाचे नेते यावेळी नागरिकांच्या बाजूने उभे राहिले आहेत.

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर कोपरखैरणे येथील शाखेबाहेर ग्राहकांनी गर्दी केली. औरंगाबादमधील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध, खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढता येणार असल्याने आकाशवाणी चौकातील शाखेत खातेदारांची गर्दी झाली होती.

पुण्यातील पंजाब महाराष्ट्र बँकेतील डांगे चौक शाखेत सभासदांचा गोंधळ उडाला असून बँक अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rush at PMC bank all over maharashtra