esakal | पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’, फडणवीसांच्या दौऱ्यावर शिवसेनेचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’, फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका

पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’, फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका

sakal_logo
By
नामदेव कुंभार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या मराठवाडा, विदर्भातील पूरग्रस्त दौऱ्यावर सामनातून शिवसेनेनं टीकेचा बाण सोडला आहे. पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. पूरग्रस्ता भागाच्या दौऱ्यादरम्यान देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांनी पक्षीय राजकारण साधल्याचेही अग्रलेखात म्हटलेय. पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर टीका करताना फडणवीसांना मोदींच्या वक्तव्याची आठवणही करुन दिली आहे.

विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे. कारण मराठवाडय़ातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱया फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर ‘व्हाया ओला दुष्काळ’ राजकारण, असाच झाला म्हणायचा! अशी टीका करण्यात आली.

महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसामुळे शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधी कोकणात महाप्रलय, दरडी कोसळणे यांसारखे प्रकार झाले. पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगैरे भाग पाण्याखाली गेला. आता विदर्भ-मराठवाडय़ातील पूरपरिस्थितीने शेतकरी नामोहरम झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर मराठवाडा, विदर्भातील पूरग्रस्त भागात गेले. त्यांनी शेतकऱयांची गाऱहाणी ऐकली. अशा प्रकारे विरोधी पक्षाने त्यांचे कर्तव्य बजावले आहे. फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे शेतीविषयक प्रश्न व आर्थिक घडी याविषयी त्यांना चांगलीच माहिती आहे. पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी विरोधी पक्ष असे दौरे करतो, तेव्हा त्यात राजकीय भागच जास्त असतो. संकटग्रस्त अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात. अर्थात फडणवीस यांच्याविषयी आम्हाला असे काहीच म्हणायचे नाही. विरोधी पक्षनेत्यांनी परिस्थितीचा ‘आँखों देखा हाल’ पाहिला व आता त्यांनी याबाबत त्यांना जे वाटते ते सरकारला सांगायला हवे, असेही अग्रलेखात म्हटलेय.

दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले, पण केंद्रीय पाहणी पथके वेळेवर आली नाहीत. त्यामुळे शेतकऱयांना अद्याप मदत मिळू शकलेली नाही. कोल्हापूरचे शेतकरी काय सांगतात तेसुद्धा राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजून घेतले पाहिजे. ‘‘आम्हाला आता केवळ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे,’’ असे काही शेतकऱयांनी म्हणे फडणवीस व दरेकर यांना सांगितले. याचा अर्थ असा की, केंद्रातल्या मोदी सरकारने शेतकऱयांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत, असेही अग्रलेखात म्हटलेय.

loading image
go to top