...तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकात पराभूत होतील

...तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकात पराभूत होतील

शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं राज्यातील भाजप नेत्यांना आणि अमित शाह यांना लक्ष करत टीका बाण सोडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, असं म्हणत नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेनं म्हटलेय की, अमित शहा हे कोणताही चमत्कार घडवू शकतात अशी प्रचार मोहीम राबवली गेली, पण अमित शहा यांच्याच काळात महाराष्ट्रात 25 वर्षे जुन्या शिवसेना-भाजप युतीचा तुकडा पडला व आता तर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. प. बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच. मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. पंतप्रधान मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील.

‘मोदी है तो मुमकीन है -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी-नड्डा जोडीने बदलले. गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्य प्रदेश, हिमाचल, हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ‘‘मोदी है तो मुमकीन है’’ म्हणायचे ते इथे!

मोदी-नड्डा जोडीचा स्वपक्षास धक्का-

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही. रूपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते, पण रूपाणी व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळास घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरदार राजकीय संदेश स्वपक्षास दिला आहे.

वाटेतले काटेकुटे स्वत:च दूर करतायेत मोदी -

मोदी आता सत्तर वर्षांचे झाले. त्यामुळे त्यांची पावले अधिक दमदार पद्धतीने पडत आहेत आणि वाटेतले काटेकुटे ते स्वतःच दूर करीत आहेत. मोदी राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच त्यांनी पक्षातील अनेक जुन्या-जाणत्यांना दूर करून मार्गदर्शक मंडळात नेमले. म्हणजे हे मार्गदर्शक मंडळ कामापुरते नसून उपकारापुरतेच ठेवले. आडवाणी, मुरली मनोहर जोशी हेसुद्धा त्याच मार्गदर्शक मंडळात बसून आहेत. कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेररचनेत अनेक जुन्यांना मोदी यांनी घरचा रस्ता दाखवून नव्यांना स्थान दिले. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची वेळ आली. मोदी यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व त्या कामी सूत्रे स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले आहे. देशात एकंदरीत गोंधळाचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com