Uddhav Thackeray | नवीन सरकारचा ट्रेलर; महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवणार? सामनातून सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray on Maharahtra Assembly Monsoon session

नवीन सरकारचा ट्रेलर; महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवणार? सामनातून सवाल

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे; पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ‘ये तो एक ट्रेलर था,’ अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे? असा सवाल सामना अग्रलेखातून शिंदे गटाला करण्यात आला आहे.(Saamana Editorial Uddhav Thackeray on Maharahtra Assembly Monsoon session mess Eknath Shinde Devednra Fadnavis Ajit pawar)

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शब्दीक चकामकीचे रुपांतर चक्क धक्काबुक्कीपर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात बाचाबाची झाली. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हटले आहे सामना अग्रलेखात?

सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही. विश्वासघात करून जन्माला आलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून सनदशीर मार्गाने कारभार चालवण्यापेक्षा धमक्या व मारहाणीसारखे गुंडगिरीचे प्रकार अंमळ अधिकच वाढले आहेत. बुधवारी विधिमंडळाच्या आवारातही नेमके हेच घडले. सत्तारूढ व विरोधी आमदारांमध्ये अभूतपूर्व धुमश्चक्री झाली.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आधी घोषणायुद्ध झाले व त्याचे पर्यवसान आधी हमरीतुमरी आणि नंतर धक्काबुक्कीमध्ये झाले. विधिमंडळाच्या आवारात आजवर कधीही घडली नाही अशी ही लाजिरवाणी घटना साऱ्या महाराष्ट्राने पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जबरदस्त धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंचे एकेरीवर तर आलेच; मग मोठी गुद्दागुद्दीही झाली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळली म्हणून पुढील भयंकर प्रकार टळला अन्यथा विधिमंडळाच्या आवारात काय घडले असते हे कोणीच सांगू शकणार नाही. असभ्य शब्दांचा वापर, अर्वाच्य शिवीगाळ आणि खेचाखेची व धक्काबुक्कीची ही घटना पाहून विधान भवनाच्या निर्जीव भिंतींनीही नक्कीच अश्रू ढाळले असतील.

पुन्हा आश्चर्य असे की, एवढे सगळे केल्यानंतर सत्तारूढ शिंदे गटाच्या एका आमदाराने थेट मीडियाशी बोलताना ‘ये तो एक ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है’, अशी धमकीच दिली. याला सत्तेचा माज नाहीतर काय म्हणायचे! असा सवाल उपस्थित करण्यात आला.

Web Title: Saamana Editorial Uddhav Thackeray On Maharahtra Assembly Monsoon Session Mess Eknath Shinde Devednra Fadnavis Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..