esakal | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनवेची थरारक रात्र
sakal

बोलून बातमी शोधा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनवेची थरारक रात्र

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनवेची थरारक रात्र

sakal_logo
By
शेलेन्द्र पाटील

सातारा - घनदाट जंगलातील मचाणाभोवतीची शांतता... उंच झाडांच्या पानांतून डोकावणारा पौर्णिमेच्या चंद्राचा मंद प्रकाश... पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांच्या दर्शनासाठी सावध नजरा वेध घेत होत्या. मनात दाटलेल्या भीतीत प्राण्यांच्या आवाजाने पडणारी भर. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मनुष्य गाभा क्षेत्रात (कोअर झोन) ४० फुटांवरून आवाज ऐकल्यानंतर जंगलातील त्या मध्यरात्रीच्या गारठ्यातही घाम फुटत होता.  

‘सह्याद्री’च्या बामणोली, कोयना, हेळवाक, चांदोली व ढेबेवाडी या पाच परिक्षेत्रांतील ६१ पाणवठ्यांवर बौद्ध पौर्णिमेच्या रात्रीचे चित्र थरारक होते. चुक..चुक चुक... असा आवाज करीत चाहूल दाखवणारे शेकरू, खर्र...खर्र...खर्र...आवाज करणारे भेकर, ट्रॅ ट्रॅ ट्रॅ असा कर्कश्‍य आवाज काढून इतर प्राण्यांना इशारा करणारे सांबर, मध्यरात्रीच्या स्मशानशांततेचा भंग करत पालापाचोळ्याचा खळखळ आवाज करत चालणारे अस्वल... प्राण्यांची ही चाहूल मनाचा थरकाप उडवत होती. वन्यजीव विभागाने २४ तास पाणवठ्यांवर राहून बौद्धपौर्णिमेच्या रात्री वन्यजिवांची गणना केली. यावर्षी पहिल्यांदाच या गणनेसाठी स्वयंसेवकांना सशुल्क सहभागी करून घेण्यात आले. वन्यजीव कर्मचाऱ्यांच्या मदतीला कुंडल (सांगली) येथील प्रशिक्षण केंद्रातील भावी वनक्षेत्रपालही होते. बौद्धपौर्णिमेला पुरेसा चंद्रप्रकाश असतो. जंगलातील सहा-नऊमाही पाणवठे आटलेले असतात. त्यामुळे वन्यजीव रात्रीच्या वेळी बारमाही पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येतात. ही संधी साधून पाणवठ्यांवर वन्यप्राणी गणना केली जाते. 

बामणोलीपासून लाँचने तासाभराचा प्रवास केल्यानंतर एका टेकडीवर पूर्वीच्या वस्तीतील खिरखिंडी गाव. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन झालेले हे गाव. वनरक्षक नवनाथ आगलावे व त्यांचे दोन सहकारी त्या ठिकाणी गणनेसाठी येणाऱ्या स्वयंसेवकाची वाट पाहत होते. त्यांच्यासमवेत सात जणांनी आवश्‍यक तेवढेच साहित्य सॅकमध्ये घेऊन पाणवठ्याच्या दिशेने कूच केली. दोनच दिवसांपूर्वी कोयना भागात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे जंगलाच्या अंतर्गत भागातील काही पाणवठे पुन्हा जिवंत झाले होते. वन्यप्राण्यांना सहज पाणी उपलब्ध झाल्याने शिवसागर जलाशयाच्या काठावर हे प्राणी पाणी पिण्यासाठी येण्याची शक्‍यता मुळीच नव्हती. त्यामुळे आम्हाला त्यांच्या पाणवठ्यापर्यंतची वाट तुडवणे गरजेचे होते. 

‘नेचेचे पाणी’ नावाच्या पाणवठ्यावर वन कर्मचाऱ्यांनी आधीच मचाण बांधून ठेवले होते. दुपारी साडेतीन वाजता डोंगर चढायला सुरवात झाली. अर्धा किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर लागलेल्या उभ्या चढणीने घाम काढला. ‘झालं... आता थोडचं अंतर राहिलं; मग सपाटी लागेल’ असे सांगून सुनील आणि निवृत्ती हे वन कर्मचारी स्वयंसेवकांचा आत्मविश्‍वास वाढवत होते. जंगलवाटेने ठिकठिकाणी झाडांवर तर काही ठिकाणी दगडावर हिरव्या रंगात अंतर दर्शविणाऱ्या खुणा. वनरक्षक नवनाथ आगलावे झाडांवर ओरखडलेल्या खुणांचे अर्थ सांगत होते. अनेक ठिकाणी खवल्या मांजराने वाळवीचे किडे खाण्यासाठी जमीन उकरून झालेली बिळं सापांची वसतिस्थानं असणारी बिळं वाटत होती. दोन ठिकाणी बिबट्याने आपल्या अस्तित्वाची ओळख दिली. त्याची विष्ठा पाहून एका बिबट्याने नुकताच माकडाचा फडशा पाडला असावा, असा अंदाज विष्टेत आढळलेल्या माकडाच्या केसांवरून नवनाथ बांधत होते. 

टपोरी करवंदीच्या जाळ्या पाहिल्यानंतर चालण्यातील शिणवटा कुठल्या कुठे पळून जात होता. ‘नेचेचे पाणी’ या पाणवठ्यावर डोंगर उतारावर एका छोट्या घळीमध्ये पाण्याचा झरा होता. त्याच्यापुढेच मोठे डबके साचले होते. या डबक्‍यापासून ४० ते ५० फूट उंचीवर एका वैशिष्ट्यपूर्ण झाडाच्या फांद्यांचा आधार घेत मचाण बांधले होते. लगतच्या दोन लांबसडक झाडांवर आडव्या जाड ढांप्या बांधून मचाणावर चढण्यासाठी शिडी केलेली होती. मचाणावर सॅक टाकून सगळे पाण्याच्या डबक्‍याजवळ गेले. डबक्‍याकडेच्या चिखलात गवे व इतर तृणभक्षी जनावरे येऊन गेलेल्याच्या खाणाखुणा होत्या. कोणता कोणाचा पाय, कोणाची खुरे कशी असतात, याची माहिती वन कर्मचारी मोठ्या उत्साहाने सांगत होते. परंतु, कधी एकदाचा अंधार पडतोय आणि कधी जनावर पाण्याला येतंय, अशी उत्सुकता स्वयंसेवकांना होती. त्यामुळे खाणाखुणांकडे सपशेल दुर्लक्ष करत सर्व जण मचाणावर जाऊन बसलो. हलका आहार घ्यायचा असल्याने बिस्कीट पुडा आणि ग्लुकोज पावडर हेच अन्न आणि पाणी होते. 

जंगलात सर्वात लवकर अंधार पडू लागतो. सर्वांच्या नजरा वन्यप्राण्यांच्या वाटेकडे होत्या. मोबाईल स्वीचऑफ झाले होते. रात्रीच्या साडेआठचा सुमार असेल. शांतता भंग करणारा ‘ट्रॅ...ट्रॅ....ट्रॅ....’ असा विचित्र व कर्कश्‍य आवाज येऊ लागला. मचाणावर एकमेकांचे हात हातात घेऊन सतर्कतेचा इशारा झाला. पौर्णिमेचा चंद्र उगवला असला तरी तो डोक्‍यावर आला नसल्याने पाणवठ्यावर आलेला प्राणी दिसत नव्हता. तो आवाज निश्‍चितच पाणवठ्यावरून नव्हता. सुमारे अर्धा तासाच्या आरडा-ओरड्यानंतर आवाज दूर जात बंद झाला. सांबराचे हे ओरडणे काय सूचित करत होते, नेमकं सांगता येत नव्हते. सायंकाळनंतर एका सांबराशिवाय चार-पाच तास काहीच दृष्टीस पडले नव्हते. 

समोर ३०-४० फुटांवर पाण्याचा झरा व भोवती डबके याशिवाय अंधारात काहीच दिसत नव्हते. स्मशानशांततेत सर्वांचे कान आवाजाचा वेध घेत होते. रात्री दीडच्या सुमारास अंधारात पुन्हा खुरांचे आवाज आले. ते गवेच असावेत, हा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी खरा ठरविला. पाणवठ्यानजीक थांबलेले चार गवे डबक्‍यात उतरायला मागेनात. पाणीही न पिता गवे जंगलात गडप झाले. त्यापुढील संपूर्ण रात्र सर्वांनी जागून काढली. मात्र, एक जनावर पाणवठ्यावर येईल तर शपथ! 

पहाटेच्या गारव्यात जरा कुठे डोळा लागला; परंतु लगेच पाखरांच्या गलक्‍याने पुन्हा जाग आली. डोक्‍यापर्यंत चादर गुरफटून घेऊन मोबाईलच्या उजेडात पाहिले तर पाच वाजले होते. रात्रभराच्या जागरणामुळे शरीर काहिसे आळसावले असले तरी सकाळी सकाळी एक तरी प्राणी स्पष्टपणे पाहायला मिळेल, या आशेने मनाने तरतरी घेतली होती. सहाच्या सुमारास खर्र...खर्र...खर्र करत एका भेकराने हजेरी लावली. ते आणि त्याचेच काय ते झालेले दर्शन ! काही मिनिटांनंतर भेकरंही निघून गेले. राज्य प्राणी असलेल्या शेकरूने (मोठी खार) नेचेच्या पाणवठ्यावर हजेरी लावली खरी; परंतु त्याची उपस्थिती ही हजेरीपुरतीच होती. काही मिनिटांत उंच झाडांच्या शेंड्यांमध्ये तेही दिसेनासे झाले. सूर्यनारायणाने कधीच दर्शन दिले होते.

loading image
go to top