सराला बेटावर होणार साई शताब्दी धर्मशाळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

महाराज वैराग्यमूर्ती होते. पंढरीच्या आषाढीला वारीला जाताना आपली सराला बेटावरील पाचटाची कोपी पेटवून देत. साईबाबादेखील भाविकांनी दिलेले पैसे असेच वाटून टाकत. पाच घरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत.

शिर्डी, 1 : साईबाबांनी कीर्तनाची परंपरा जपली. संतकवी दासगणू महाराज यांनी त्यांना साक्षात पांडुरंगाची उपमा देत, शिर्डी माझे पंढरपूर अशी आरती रचली. वारकरी संप्रदायातील थोर संत गंगागिरी महाराज यांनी साईबाबांची ओळख शिर्डीकरांना करून दिली. ही स्मृती जपण्यासाठी शिर्डीकरांतर्फे येथून जवळच असलेल्या महंत गंगागिरी महाराजांच्या सराला बेटावर एक कोटी खर्च करून साई शताब्दी धर्मशाळा बांधण्यात येत आहे.

शिर्डीतील विठोबा आणि संत गंगागिरी महाराज यांच्यातील पहिल्या भेटीची स्मृती या धर्मशाळेच्या निमित्ताने कायमची जपली जाणार आहे. साईबाबा आणि हरिकीर्तनाचे नाते जिवाभावाचे. त्यांच्या काळापासून नारदीय कीर्तन आणि "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'चा गजर झाला नाही, असे एकाही उत्सवात झाले नाही.

येथे येऊन झाडांना निमूटपणे पाणी घालणारे साई आणि संत गंगागिरी महाराज यांची भेट झाली. त्या वेळी महाराजांनी "अरे, हा तर हिरा आहे हिरा' अशा शब्दांत शिर्डीकरांना बाबांची ओळख करून दिली.

महाराज वैराग्यमूर्ती होते. पंढरीच्या आषाढीला वारीला जाताना आपली सराला बेटावरील पाचटाची कोपी पेटवून देत. साईबाबादेखील भाविकांनी दिलेले पैसे असेच वाटून टाकत. पाच घरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत.

साईबाबांच्या महानिर्वाणानंतर तब्बल शंभर वर्षांनी या इतिहासाला उजाळा देण्याची संधी शिर्डीकरांना मिळाली. दोन वर्षांपूर्वी साईसमाधी शताब्दी वर्षात सद्‌गुरू गंगागिरी महाराज यांचा हरिनाम सप्ताह आयोजित केला. त्यास लाखभर भाविकांना हजेरी लावली.

साईसंस्थानने भरीव आर्थिक मदत केली. या निमित्ताने जमा केलेल्या लोकवर्गणीतून एक कोटी रुपये शिल्लक राहिले. त्यातून सराला बेट येथे साई समाधी शताब्दी धर्मशाळा उभारण्यात येत आहे. 

साईमंदिरात रोज साईबाबांच्या आरतीबरोबरच ज्ञानोबा आणि तुकोबांच्यादेखील आरत्या, तसेच संत नामदेवांची "घालीन लोटांगण' ही रचना आळवली जाते. भाषा, प्रांत आणि देशाच्या मर्यादा ओलांडून, कोट्यवधी साईभक्त वारकरी संप्रदायातील संतांच्या शुद्ध मराठीतील या आरत्या रोज आळवतात. सराला बेटावरील साई शताब्दी धर्मशाळा हे भक्तिमार्गाचे प्रतीक ठरेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Shatabdi Dharamshala will be held on Sarla Island