सकाळ चित्रकला स्पर्धा १६ डिसेंबरला

सकाळ चित्रकला स्पर्धा १६ डिसेंबरला

महाराष्ट्र, गोव्यात आयोजन; मुलांच्या कल्पनांना वाव देणारी स्पर्धा 
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ येत्या १६ डिसेंबरला (रविवार) होणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात एकाच दिवशी जवळपास दोन हजार ठिकाणी ही स्पर्धा होत आहे.  देशातल्या या सर्वांत विद्यार्थिप्रिय स्पर्धांमध्ये गेल्या ३३ वर्षांत जवळपास एक कोटी जणांनी सहभाग नोंदवला आहे.

प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असलेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अथवा शाळांना कोणतेही प्रवेशशुल्क नाही. इच्छा असूनही स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाही ऑनलाइन सहभाग घेता येणार आहे. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुलेही मोठ्या संख्येने सहभागी होतात.

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग आहे. त्यामुळेच मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. तीन पिढ्यांना जोडणारी ‘सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धा’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेले विद्यार्थी चित्रकार हे सातपुड्याच्या पर्वत रांगांपासून महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये महानगरांमध्ये दिसणारे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडलेल्या मागील पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते. 

यंदाही ही स्पर्धा महाराष्ट्र आणि गोव्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. गट अ- इयत्ता पहिली व दुसरी, गट ब- इयत्ता तिसरी व चौथी, गट क- इयत्ता पाचवी ते सातवी व गट ड- इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होणार आहे. 

मी घरी चित्रांचे काम करताना आदर्शा आणि आर्यन पहात असत. त्यातून दोघांना आवड निर्माण झाली. दोघांचा कल पाहून त्यांना जलरंग, कागद व इतर साहित्य, चित्रकलेची पुस्तके देत गेलो. माझे वडील बाबूराव, भाऊ दयानंद व मी याच क्षेत्रात असल्याने घरात चित्रकलेचे पोषक वातावरण आहेच. यातूनच ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत दोन्ही मुले सहभागी होऊ लागली. त्यामुळे दोघांचाही आवाका वाढला. स्पर्धेत आदर्शाने पहिली ते पाचवी गटात प्रथम, तर आर्यनने आठवी ते दहावी गटात दुसरा क्रमांक मिळविला. ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठामुळे दोघांना प्रोत्साहन तर मिळालेच, शिवाय पुढील वाटचालीस बळही मिळाले.
- रमण लोहार, आदर्शा व आर्यनचे वडील, गडहिंग्लज (कोल्हापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com