आव्हानांचा डोंगर, अस्तित्वाची लढाईवर हवा जिद्दीचा उतारा 

आव्हानांचा डोंगर, अस्तित्वाची लढाईवर हवा जिद्दीचा उतारा 

कोरोनाच्या थैमानाने राज्यातील उद्योगांची घडी पुरती विस्कटली आहे. साथीमुळे कारखानदारांपासून कामगारांपर्यंत प्रत्येकासमोर अस्तित्वाची लढाई उभी ठाकली आहे. सध्याच्या घडीला नियम, अटींना अधीन राहून उद्योग पुन्हा उभे राहू लागलेत. तथापि, सुरक्षित ठेवण्यापासून ते कामगारांची चणचण, वाहतूकदारांचे प्रश्न, कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील अडथळे, मालाला घटलेली मागणी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या उद्योगांसमोर आव्हान आहे ते खेळते भांडवल उभे करण्यापासून ते कामगारांना पुन्हा कारखान्यात येण्यास प्रवृत्त करण्यापर्यंतचे...

परराज्यातील कामगार त्यांच्या गावी परतल्याने कामगारांची चणचण आहे. मात्र, मुंबई, पुण्याबाहेर पडून गावी परतलेल्यांना त्यांच्याच जिल्ह्यात रोजगाराची संधी मिळू शकते, असेदेखील आशादायक वातावरण आहे. भूमीपुत्राने या संधीत आपल्या कौशल्यात वाढ करून आपले स्थान बळकट करण्याची स्थिती जशी आहे, तसेच स्थानिक उद्योगांनाही माणूस म्हणून आधार देत त्यांना उभे केल्यास नवी पहाट होवू शकते, हे खरेच... महाराष्ट्रभरातील ‘सकाळ'च्या बातमीदारांनी घेतलेला मागोवा... 

***************************************
मुंबई आणि परिसर 

***************************************
केवळ वीस टक्के कारखाने सुरू, मात्र प्रवास आणि भीतीचा धाक 
मुंबई - शहर आणि परिसरातील २०-२५ टक्के कारखाने सुरु झालेत, यापैकी काही आधीपासूनच सुरु होते. अद्यापही कोरोनाची भीती अन् प्रवासातील अडचणींमुळे अन्य कारखाने सुरु होण्यात अडचणी आहेत. 

कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ या पट्ट्यातील एमआयडीसी क्षेत्रात औषधे, अत्यावश्यक रसायने, खतनिर्मितीच्या कारखान्यांना संमती आहे. प्रोसेसिंग युनिट्सनादेखील संमती मिळाली आहे. कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ एमआयडीसीमधील बिगर अत्यावश्यक रसायने, स्टील व इंजिनिअरिंग, डाय, कापडनिर्मिती हे कारखाने बंदच आहेत. नव्याने संमती मिळालेल्या कारखान्यांना प्रथम स्वच्छता, यंत्रांची दुरुस्ती-देखभाल व तेलपाणी ही कामे करावी लागताहेत. पंचवीस ते तीस टक्के कामगारांना बोलावण्याची परवानगी असून तेवढे कामगार येताहेत. रोज कामगारांचा ताप तपासणे, सॅनिटायझेशन करणे, मास्क-हातमोजे व सुरक्षित अंतर आदी काळजी घेतली जात आहे. काही कारखान्यांमध्ये व्यवस्थापकदेखील कामगारांचे प्रबोधन करत आहेत, असे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी ‘सकाळ'ला सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील कामगार ज्या वसाहतींमध्ये राहतात तेथील रहिवासी या कामगारांना कामावर न जाण्यासाठी दडपण आणीत आहेत. कामावर गेलात तर घरी परत येऊ नका, कारखान्यातच राहा, असे सांगताहेत. येथे तीन कारखाने चालविणारे इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष मनप्रीतसिंह नागी मुंबईत राहतात, त्यांना बदलापूरपर्यंत जाण्यासाठी एक-दोन जिल्हे ओलांडावे लागतात. अशा स्थितीत पोलिस संमतीची प्रक्रिया किचकट असल्याने त्यांनी ती केली नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत सरव्यवस्थापकही कारखाना सुरु करण्याची जोखीम घेत नाही, असे त्यांनी सांगितले. 

‘अंधेरी सीप्झ'चे 10 टक्केच काम 
मुंबईतून रत्न व आभूषणांची निर्यात करणाऱ्या अंधेरीच्या सीप्झ परिसरातील कारखान्यांना परवानगी मिळालेली आहे. मुंबईत फक्त या निर्यातप्रवण उद्योगांलाच संमती आहे. येथील कारखान्यांचे दहा टक्के काम सुरु असून, निर्यातही होते. मात्र अजूनही बाहेरगावी विमाने आठवड्यातून एकदाच जातात, त्यामुळे निर्यातीला वेग नाही. बसचालक गावी गेल्याने कामगारांना आणायलाही त्रास होतो. मात्र बेस्ट या कारखानदारांना पुढील आठवड्यापासून मदत करणार आहे. 

‘अंधेरी सीप्झ'मधील कारखाने – 150 
सुरु झालेले कारखाने – 100 
कामगारांची संख्या – 50 हजार 
कामावर येणारे कामगार – 3 हजार 

प्रकार ----------कल्याण डोंबिवली ---- अंबरनाथ ------ बदलापूर 

एकूण कारखाने – 480 ---- ७०० ---------- ३५० 

मंजुरी मिळाली, सुरु झाले – 65 ---- १५० ------ ३५ 

कामगारांची उपस्थिती (टक्क्यांत) – 20 ते 25 ------- 20 ते 25 ------- २० 

सध्या तरी रेल्वे व महापालिकेच्या बससेवा बंद असल्याने प्रवास हीच महत्वाची समस्या आहे. कामगारांना येण्या-जाण्यास त्रास होतो, कामगारांची संख्या वाढली तर हा त्रास आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 
- मनप्रीतसिंह नागी, अध्यक्ष, इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस आणि बदलापूर एमआयडीसीमधील उद्योजक. 

कामगारांना प्रवासाचा मोठा त्रास आहे, मुंबईत जागोजागी कंटेनमेंट एरिया असल्याने पोलिसांचीही कडक भूमिका आहे. लॉकडाऊनआधी विमानतळावर आयात कच्चा माल आला. संचारबंदीमुळे तो आणता न आल्याने आता विमानतळ प्राधिकरण मोठा दंड आकारीत आहे. 
– राजीव पंड्या, अध्यक्ष सीप्झ जेम्स अँड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. 
***************************************

चाकांना वेग...पण गती धिमी 
कोल्हापूर - प्रशासनाने घातलेले नियम, अटी पाळून कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत काम सुरू झाले आहे. वाहतूक पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठवण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कामगारांचे तापमान तपासून जादा तापमानाचे कामगार व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करून विश्रांती दिली जात आहे. निरोगी कामगारांना सॅनिटायझर फवारुन प्रवेश मिळतो. सुरक्षित अंतराच्या पालनानेच काम सुरू आहे. मालवाहू वाहनांमध्येही सॅनिटायझर फवारून माल भरण्यात येतो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे फाऊंड्रीतील उत्पादनावर अंतिम प्रक्रिया रखडलेली होती. उद्योगांना परवानगीनंतर मशीन शॉप आणि फाउंड्री उद्योग सुरू झाले. इतर उद्योगही सुरू होताहेत. मशिनरी बंद राहिल्यामुळे तांत्रिक बिघाड निर्माण झालेत. ते दूर करण्यासाठी पुण्या-मुंबईमधीलच तंत्रज्ञ येणे गरजेचे आहे; मात्र ती शहरे रेड झोनमध्ये आहेत. तेथून कोणीही आले तरी त्यांची रवानागी विलगीकरण केंद्रात होत असल्यामुळे दुरुस्ती थांबलेली आहे. इंजिनिअरिंग उद्योगातले टुलिंगही उपलब्ध नाही. फाउंड्री उद्योगातले परप्रांतीय मजूर गावी परतल्यामुळे सध्या कामगार शोधून, प्रशिक्षित करून काम करावे लागतंय. 

सिंधुदुर्गात गती धिमी 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काजू प्रकिया उद्योग सुरू असले तरी कामगारांची संख्या जेमतेम आहे. जेथे निव्वळ परजिल्हा-परराज्यातील कामगार आहेत ते कारखाने बंदच आहेत. आंबा, कोकम प्रक्रीया उद्योग सुरू आहेत. आंबा कॅनिंगदेखील मेच्या सुरवातीलाच सुरू झाले. पॅकींग, ग्रेडिंगवेळी समस्या जाणवतात. 

सांगलीत आली गती 
सांगली जिल्ह्यात 20 मेअखेर 1760 उद्योगांना तसेच 22 हजार 36 कर्मचाऱ्यांची परवानगी मिळाली. यामध्ये कुपवाड, मिरज, सांगलीसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील 902 उद्योगांना तसेच 11 हजार 285 कामगार तसेच जिल्ह्यातील 858 उद्योग व 10 हजार 751 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येथे प्रामुख्याने डेअरी, पशु/पोल्ट्रीखाद्य उद्योग, कोल्ड स्टोअरेज/वेअर हाउस, कॉरोगेटेड बॉक्‍, औषधे व वैद्यकीय साधने, पॅकिंगशी संबंधित उद्योग सुरू झालेत. 

रत्नागिरीत रसायन कारखाने सुरू 
रत्नागिरी जिल्ह्यात 937 पैकी 551 उद्योगांची धडधड सुरू झाली. 10 हजार 324 कामगार कार्यरत झाले. एसटी पूर्णपणे सुरू नसल्याने कामगारांसाठी कंपन्यांनी गाड्यांची व्यवस्था केली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीमधील रसायन आणि औषधे, खत निर्मिती कारखाने सुरू होताहेत. तसेच मत्स्य व काजू प्रक्रिया, वाहने, नौकांचे सुटे भाग, फर्निचर बनविणारे उद्योग सुरू झालेत. 

दृष्टीक्षेपात चार जिल्हे (टक्क्यांत) 
कागदोपत्री उद्योग सुरू - 50 ते 60. 
होणारे उत्पादन क्षमतेच्या - 15 ते 20. 
कामगारांची उपस्थिती - 20 ते 40. 
सध्या सुरू असणारी वाहतूक - 10 ते 15. 

खरेदीदारांची संख्या घटल्याने वाहनांचे उत्पादन घटेल आणि त्याचा परिणाम सुट्ट्या भागांच्या पुरवठादारांवर होईल. मालवाहू वाहनांची मागणीही घटेल. भारताने आयात-निर्यातीवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून उद्योगाला पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. 
- निरज झंवर, कार्यकारी संचालक, झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज 

***************************************

ऑटोमोबॉईल, इलेक्‍ट्रीकल  उद्योगांना मिळाली चालना 
नाशिक -
शहर व जिल्ह्यामध्ये सुमारे सहा हजार 700 उद्योग आहेत. लॉकडाऊनमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग सुरळीत होते. लॉकडाऊनमधील ढिलनंतर उद्योगांची चाके फिरू लागली. ऑटोमोबॉईल व इलेक्‍ट्रीकल उद्योगांना चालना मिळाली. इलेक्‍ट्रीकल उद्योग पायाभूत सुविधांवर चालतो. केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या अखत्यारीतील पायाभूत प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमधील इलेक्‍ट्रीकल उद्योगांनी पुर्वीच्या ऑर्डर पूर्ण करण्यावर भर दिलाय. महिंद्रा, बॉश, सीएट, एबीबी, ग्राफाईट इंडिया, टेक्‍नोफोर्स, एक्‍सलो, ग्लेनमार्क, सिमेन्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, ल्युसी, केमप्लास्ट, लिअर इंडिया, जिंदाल, थायसन क्रुप, महिंद्र (इगतपुरी), हिंदुस्तान ग्लास, जिंदाल सॉ पाईप, केएसबी, केबल कार्पोरेशन या महत्वाच्या कंपन्या सुरु झाल्यात. राज्यांतर्गत माल वाहतूक सुरु झाली तरी देशांतर्गत कच्च्या मालाची वाहतूक पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे पुरवठ्यात अडचणी येतात. दिल्ली, भोपाळ, इंदूर, मुंबई येथून नाशिकमध्ये कच्चा माल येतो. परंतू ही शहरे रेड झोनमध्ये असल्याने माल पोहोचत नाही. 

कामगारांच्या उपस्थितीवर प्रश्‍नचिन्ह? 
एमआयडीसीने "सेल्फ डिक्‍लेरन्स' अर्जावर कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली. पाचशे ते तीन हजार कामगार संख्येच्या कारखान्यांमध्ये अद्यापही 33 टक्के हजेरी आहे. तीन पाळ्यांमध्ये कामकाज चालते. कारखान्यांमध्ये एखादे उत्पादन करताना प्रत्येक टप्प्यावर तज्ञ असतो, परंतू ते काम आधीच्या किंवा नंतरच्या कामगाराला शक्‍य नाही किंवा एक व्यक्ती एकाचवेळी अनेक मशीन हाताळू शकत नसल्याने निर्मितीची गती धिमी आहे. कामगारांना त्याच्या घरापासून बसने कंपन्यांमध्ये आणण्याची सोय आहे. परंतू एका बसमध्ये पन्नास टक्के कामगार येतात. त्यामुळे कारखान्यांमध्ये कामगारांची उपस्थित तुरळक आहे. 

कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक कामगारावर सॅनिटायझर फवारले जाते. मास्क असेल तरचं प्रवेश, कारखान्यात कामाच्या जागेवर सॅनिटायझर असते. हॅण्डग्लोज, डोक्‍यावर टोपी बंधनकारक आहे. कंपन्यांकडून त्याचा पुरवठा होतो. प्रत्येक कामगाराच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जाते. शंभर अंश फॅरनाईटपुढे तापमान असल्यास प्रवेश नाकारला जातो. कॅन्टीनमध्ये अंतराने बसविले जाते. जेवणाच्या वेळाही बदलल्यात. 

चित्र उपस्थितीचे 
- उद्योगांची संख्या - १२,००० 
- सुरू उद्योग - ७५०० 
कामगारांची उपस्थिती - ६५,००० 

सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे. कंपन्या कामगारांच्या आरोग्याबाबतीत धोका पत्करत नाहीत. कामगारांसह बाहेरून आलेल्या व्यक्तीचे सॅनिटायझेशन केले जाते. मास्क, हॅण्डग्लोज असेल तरंच कारखाना आवारात प्रवेश दिला जातो. 
- प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, नाशिक प्लान्ट. 

***************************************

वाहतूक, पुरवठा विस्कळीत, कामगारांच्या कमतरतेने अडथळे 
औरंगाबाद -
शहर आणि परिसरतल्या पाच एमआयडीसींपैकी शेंद्रा, वाळूज, पैठण येथील १८०० उद्योगांना परवानगी मिळाली, त्यापैकी दीड हजार उद्योग सध्या सुरू आहेत. मात्र वाहतूक, सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही त्यांच्यासमोरील आव्हाने आहेत. 

मागील महिन्यात औरंगाबादेत बजाज, इंडूरन्स, व्हॅराक, बडवे इंजिनिअरिंग, तर आता स्कोडा, पर्किन्स या प्रमुख कंपन्या सुरू झाल्यात. मात्र स्थानिक बाजारपेठेवर अवलंबीत तीनशे ते चारशे उद्योग अद्यापही बंद आहेत. सुरु झालेल्या कंपन्यांमध्ये २५ ते ३५ टक्केच कामगार आहेत. कंपन्यांनी मशीन लाईनचे ले-आउट बदललेत, कामगारांमध्ये एक मीटरचे अंतर राहील, असे नियोजन केले आहे. 

उद्योगांची पुरवठा व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने काही कंपन्यांना कच्च्या मालाचा तुटवडा जाणवतोय. काही कंपन्यांना उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येताहेत. एक दिवसाच्या कामाला आता ३-४ दिवस लागताहेत. शहरातील कामगारांना कंपनीपर्यंत जाण्यासाठी वाहनपासचा अडथळा कायम आहे. अजूनही अनेक कामगारांच्या मनात भीती असल्याने ते कंपनीत जाण्यास तयार नाहीत. 

येथील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, पैठण या एमआयडीसीमध्ये अडीच ते तीन लाख कामगार आहेत. वाळूजमध्ये आठ ते दहा हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. आजमितीला एक ते दीड लाख कामगार आपापल्या गावी परतलेत. प्रशिक्षित व टेक्निकल कामगार अद्यापही थांबून आहेत. कंपनी तसेच ठेकेदारातर्फे त्यांच्यासाठी किराणा व इतर साहित्य पुरवले जाते. काही कंपन्यांनी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. कामगारांचे गेटवरच रोज स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन केले जाते. 

उद्योगांच्या स्थितीवर एक नजर 
- परवानगी दिलेले उद्योग - १८०० 
- कार्यरत उद्योग - १५०० 
- ३५०० लघुउद्योजक, ५ हजार सूक्ष्म उद्योजक 
- दहा बियर, देशी व विदेशी मद्य निर्मिती कंपन्या 
- कामगारांना दुचाकीच्या परवान्याची अडचण 
- शहरातून एमआयडीसीमध्ये जाणे अडथळ्याचे 
- अनेक कंपन्यांनी मशीनच्या लाईनच्या बदलल्या रचना. 

सध्याच्या घडीला दीड हजार कंपन्या सुरू आहेत. कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक, कामगारांना दुचाकीचा परवाना हे अडथळे अजूनही कायम आहेत. ६० टक्के कंपन्यांचे कामगार हे इतर वाहतुकीवर अवलंबून आहेत. यामुळे वाहतूक आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील अडथळे तातडीने दूर होणे आवश्यक आहे.  
- मुकुंद कुलकर्णी , अध्यक्ष, सीआयआय 

***************************************

कच्च्या मालाअभावी उत्पादनात अडथळे 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात दोन महिन्यांपासून टाळेबंदी आहे. ३ मेच्या आदेशानंतर काही अटी आणि शर्तींवर टाळेबंदी शिथिल करण्यात आली. सरकारच्या निर्णयानंतर नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र काहीसे पूर्वपदावर येऊ लागले आहे. २ हजार १४३ लघु आणि मोठे उद्योग सुरू झाले, ४० हजार कामगार कामावर रुजू झाले आहेत. अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातही सर्व प्रमुख उद्योग सुरू झाले आहेत. सरकारने घातलेल्या अटींनुसार कमी कामगार असल्यांमुळे उत्पादनाला पाहिजे तसा जोर आलेला नाही. कर्मचाऱ्यांची संख्याही ४० ते ४५ टक्के आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगारांची वर्दळ वाढली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील इंडोरामा आणि जॉन्सन या कंपन्यांनी काम सुरू केलेले नाही. 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. कच्चा माल आणणे आणि तयार वस्तूंची वाहतूक करणे यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. दुसरीकडे परप्रांतीयांसह स्थानिक कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने शहरे सोडून मोठ्या संख्येने गाव जवळ केले आहे. उद्योगात उत्पादीत मालापासून ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची साखळी पूर्ण होत नसल्याने उद्योगांना अडचण येत आहेत. 

चित्र विदर्भातील आठ जिल्ह्यांचे 
सुरू झालेले उद्योग - 5300 
बंद उद्योगांची संख्या - 900 
कामावर आलेले कामगार - 1 ते 1.2 लाख (सुमारे 40-50 टक्के) 

उद्योगांतर्फे केल्या जाणाऱया उपाययोजना 
(१) नियमित सॅनिटायजेशन 
(२) आळीपाळीने ड्युटी 
(३) सुरक्षित अंतराचे पालन 
(४) काही उद्योगात कामगारांच्या राहण्याचीही व्यवस्था 

कोरोनामुळे उद्योग बंद असल्याने उद्योजकांजवळील खेळते भांडवल संपले आहे. मागील वर्षाचेच ऑडिट झालेले नसल्याचे कारण सांगून बँकांकडून उद्योजकांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उद्योग सुरू केले; पण खेळते भांडवलच नसल्याने उत्पादन कसे सुरू करणार, असा प्रश्‍न आहे. 
- शशिकांत कोठारकर, सचिव, बुटीबोरी मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, नागपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com