Sakal Survey: महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीचा धोका

पक्षाचे अस्‍तित्‍व राखण्याचे चंद्रकांत पाटलांना मोठे आव्हान
vidhan parishad election
vidhan parishad electionEsakal
Summary

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेनेने एकत्र येऊन विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासमोर बंडखोरीचा मोठा धोका आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील सद्याची राजकीय परिस्थितीत पाहता लगेच निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी भक्कम आहे, पण सगळेच स्वतंत्र लढल्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)यांना त्यांच्याच जिल्ह्यात पक्षाचे अस्‍तित्‍व राखण्याचे मोठे आव्हान असेल. पण ‘महाविकास’(Mahavikas) मधील राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (NCP, Congress, Shiv Sena)एकत्र लढल्यास या आघाडीला बंडखोरीचा धोका आहे. त्याचा फायदा भाजपला काही मतदार संघात होऊ शकतो. आघाडी एकत्र लढल्यास विद्यमान आमदारांनाच संधी दिली जाईल, त्यातही वर्चस्व दोन्ही काँग्रेसचे असेल मग शिवसेनेचे इच्छुक शांत बसतील का ? हा खरा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदार संघ आहेत. हा जिल्हा तसा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील दोन्हीही खासदार राष्ट्रवादीचे तर तब्बल चार आमदारही या पक्षाचे होते. पण पक्षांतर्गत वादातून लोकसभेच्या दोन्हीही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या. विधानसभेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वकर्तत्त्वावर आपली जागा राखली तर चंदगडमध्ये राजेश पाटील यांना राष्ट्रवादीच्या उमदेवारीचा लॉटरी लागली. पण २०१४ मध्ये भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसने तब्बल चार जागांवर विजय मिळवला. २०१४ मध्ये तब्बल सहा जागा जिंकलेल्या पण २०१९ मध्ये यातील पाच जागांवर पराभव स्विकारण्याची वेळ आली. पालकमंत्री सतेज पाटील यांची ताकद आणि संघटनाच्या जोरावर काँग्रेसला घवघवीत यश मिळवता आले.

सर्वच पक्षांनी आज स्वबळावर लढायचे ठरवले तर दहापैकी सहा मतदार संघात राष्ट्रवादीला प्रबळ उमेदवारही मिळणार नाही अशी स्थिती आहे. काँग्रेसचे दक्षिणसह उत्तर, करवीर व हातकणंगले मतदार संघातील चारही आमदार पुन्हा पालकमंत्री पाटील यांच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणू शकतात. पन्हाळ्यचे आमदार ‘जनसुराज्य’ चे विनय कोरे व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी निकालानंतर भाजपला पाठिंबा दिला. आता निवडणुकीत श्री. कोरे यांच्या मतदार संघात भाजपकडे प्रबळ उमेदवार नाही तर श्री. आवाडे यांच्या विरोधात भाजपकडे माजी आमदार सुरेश हाळवणकर तुल्यबळ आहेत. पण भाजप श्री. हाळवणकर यांना बसवणार की आवाडेंच्या मागे ताकद लावणार ह प्रश्‍न आहे. श्री. हाळवणकर हे आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते असल्याने त्यांना डावलणे भाजपला अशक्य आहे.

vidhan parishad election
सतेज पाटील-महाडिक कुटूंबातील वाद कमी होणार ;हसन मुश्रीफ

मुश्रीफ हे पुन्हा एकदा कामाच्या जोरावर डब्बल हॅटट्रीक करतील पण त्याचवेळी चंदगडची जागा पुन्हा जिंकायची झाल्यास राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान भाजपचे शिवाजी पाटील यांचे असेल. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर हे राष्ट्रवादीतील मेव्हण्या पाहुण्यांच्या वादात ‘हॅटट्रीक’ करू शकतात, पण जिल्ह्याचा इतिहास बघिताल तर अलिकडे श्री. मुश्रीफ यांच्याशिवाय सलग तीनवेळा कोणी विजयी झालेले नाही हा इतिहास आहे. त्यात श्री. आबिटकर यांच्या कामाची पध्दत, लोकांच्या तक्रारी यावर ते कशी मात करतात हे बघावे लागेल.

vidhan parishad election
शहांनी महाडीकांना दिला 'शब्द' ; विनय कोरे चर्चेच्या केंद्रस्थानी

आघाडी लढल्यास भाजपला संधी?

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेनेने एकत्र येऊन विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासमोर बंडखोरीचा मोठा धोका आहे. त्याचा फायदा काही मतदार संघात भाजपलाही मिळू शकतो. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, हातकणंगलेतून डॉ. सुजित मिणचेकर, पन्हाळा-शाहुवाडीतून सत्यजित पाटील-सरूडकर, शिरोळमधून उल्हास पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, करवीरमधून चंद्रदीप नरके असे तब्बल सहा आमदार शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीत मिळाले. पण २०१९ मध्ये श्री. आबिटकर वगळता इतर सर्वांचा पराभव झाला. त्यातही श्री. क्षीरसागर, श्री. नरके, डॉ. मिणचेकर यांनी आपआपल्या मतदार संघाचे सलग दोनवेळा प्रतिनिधीत्व करूनही त्यांना ‘हॅटट्रीक’ साधता आली नाही. २०१९ मध्ये शिवसेनेच्या पाच पराभवांपैकी ती जागा काँग्रेसने तर शिरोळमध्ये अपक्षा राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व पन्हाळ्यात ‘जनसुराज्य’ च्या श्री. कोरे यांनी विजय मिळवला. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या भाजपच्या विद्यमान आमदारांना अनुक्रमे काँग्रेसचे ऋतुराज पाटील व प्रकाश आवाडे यांनी धूळ चारून भाजपचे जिल्ह्यातील अस्तित्वच संपुष्टात आणले.

आता महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर विद्यमान आमदारांनाच संधी देण्याशिवाय पर्याय रहाणार नाही. काही जागांत बदल झाला तरी विद्यमान आमदार थांबण्याची शक्यता नाही. मग दोनदोदा मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व केलेले शिवसेनेचे श्री. क्षीरसागर, डॉ. मिणचेकर, श्री. नरके, श्री. सरूडकर-पाटील हे थांबतील का ? हा खरा प्रश्‍न आहे. कागलमध्ये सेनेचे माजी आमदार संजय घाटगे व श्री. मुश्रीफ यांच्यात बर्यापैकी ‘अंडरस्टँडिंग’ झाले आहे, त्यामुळे या मतदार संघात आघाडीचा प्रश्‍न फारसा उदभवणार नाही. पण उर्वरित पाच मतदार संघात माजी आमदारांकडून बंडखोरी झाल्यास ते रोखण्याचे आव्हान आघाडीसमोर असेल आणि ते रोखणेही अशक्य असेल. ‘आता नाही तर कधीच नाही’ हे राजकारणातील सुत्र पाहता आणि भविष्यात काय होईल याचा अंदाज नसल्याने आघाडी म्हणून कोण थांबेल असे नाही. तसे झाल्यास आघाडी विरूध्द बंडखोर आणि भाजप असा सामना रंगल्यास त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. पण भाजपालाही जिल्ह्यातील दहापैकी सहा मतदार संघात प्रबळ उमेदवारच नाही. उर्वरित दक्षिण, इचलकरंजी आणि उत्तरमध्ये भाजपा आघाडीसमोर आव्हान उभे करू शकते.

vidhan parishad election
Photo: महाडिकांच्या माघारी नंतर पाटील समर्थकांचा कोल्हापुरात जल्लोष

भाजपपुढे मोठे आव्हान

२०१९ च्या जिल्ह्यातील भाजपच्या दारूण पराभवानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांना आपल्याच जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्त्व कायम राखण्याचे आव्हान असेल. त्याचवेळी दहा जागा लढवायच्या झाल्यास कागल, दक्षिण, इचलकरंजी व उत्तर हे चार मतदार संघ वगळता इतर सहा ठिकाणी तुल्यबळ उमेदवारांचाही शोध घ्यावा लागेल. सहापैकी पन्हाळा मतदार संघातील श्री. कोरे हे सध्या भाजपसोबत असल्यान तिथे भाजपचाही संबंध येणार नाही. पण पाच ठिकाणी तर आघाडीला सहजासहजी संधी न देण्यासाठी तरी उमेदवार द्यावा लागेल. कागलमधून जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, दक्षिणमधून पुन्हा माजी आमदार अमल महाडीक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी उमेदवार असेल. इचलकरंजीत हाळवणकर की आवाडे हा पक्षनेतृत्त्वापुढचा यक्ष प्रश्‍न असेल.

उत्तरमधून सद्यस्थितीत कोणी ताकदवान उमेदवार नसला तरी मतदार संघ आवाक्यातील असल्याने ऐनवेळी एखादा प्रबळ उमेदवार भाजपला मिळू शकेल. पण सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेसमोर भाजपचा टिकाव किती लागणार हे काळ ठरवणार आहे. कारण गेल्या वर्षभरात भाजपाला जिल्ह्यात फारसे यश मिळवता आलेले नाही. ‘गोकुळ’ च्या निवडणुकीतही महाडीक यांच्यापेक्षा भाजपची पिछेहाट झाली. आज महाडीक, आवाडे सोडले तर भाजपला जिल्ह्यात ‘मासलिडर’ शोधण्याची वेळ आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद, जिल्हा बँकेसह ‘गोकुळ’ व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अपवाद वगळता दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. सत्तेची अनेक केंद्रे दोन्ही काँग्रेसकडे असल्याने या जोरावर ते जिल्ह्यातील विधानसभाच काय पण लोकसभेचेही चित्र बदलू शकतात अशी स्थिती आहे. त्यामुळेच जिल्ह्यात भाजपचे अस्तित्त्व राखण्याचे मोठे आव्हान श्री. पाटील यांच्यासमोर असेल.

महाविकास आघाडीतही सगळेच अलबेल असे नाही. आघाडीतील विद्यमान, माजी आमदारांसह काही नव्या चेहऱ्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. राधानगरीतून ए. वाय.पाटील, इचलकरंजीतून काँग्रेसचे राहूल खंजिरे, चंदगडमधून कुपेकर कुटुंबिय, हातकणंगलेतून अलिकडेच राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार राजीव आवळे अशी अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आघाडी म्हणून एकत्रित लढायचे झाल्यास माजी आमदारांसह अशा इच्छुकांना कसे थांबवणार? हा मोठा प्रश्‍न असेल. त्यामुळे सद्यस्थितीत राज्याच्या सत्तेत असलेले तिन्हीही पक्ष स्वबळावरच लढतील, हे करत असताना त्याचा फायदा फक्त भाजपला होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com