Teacher Recruitment
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन अधीक्षक लक्ष्मण बालवाड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या कारवाईत सापडले. तेथील तात्पुरता पदभार स्वीकारण्यास उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी नकार दिला. त्यामुळे ऐनवेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन अधीक्षक भरत कासले यांच्याकडे अधीक्षकाचा पदभार सोपवावा लागला. मात्र, त्यांच्याकडे या विभागाचा शालार्थ प्रणालीचा लॉगिन आयडीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ९८१ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील १४ हजार ५०० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या रडावर माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन अधीक्षक कार्यालय आहे. १८ जून रोजी माढ्यातील एका माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्याच्या हक्काचा ‘जी-पीएफ’ काढण्यासाठी सहा हजारांची लाच घेताना एकजण रंगेहाथ सापडला होता. यात वेतन अधीक्षकावरही गुन्हा दाखल झाला. यापूर्वी देखील याच कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी देखील चार-पाच महिने अधीक्षकाचा पदभार तात्पुरता दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला होता. आता पुन्हा तशीच वेळ आली आहे.
तात्कालिन वेतन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांना सध्या तात्पुरता पदभार घेण्यासंदर्भात विचारणा झाली. त्यासाठी ढेपेंनी शिक्षणाधिकाऱ्यांना नकार कळविला. अशावेळी जिल्ह्यातील ३५१ खासगी प्राथमिक शाळांमधील अडीच हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामकाज पाहणारे भरत कासले यांच्याकडे पदभार देण्याचा निर्णय झाला. त्यांनीही नकार दिला होता, तरीपण त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षकपदाचा पदभार दिला गेला. आता या तात्पुरत्या अधीक्षकांना उपसंचालकांकडून शालार्थ प्रणालीचा स्वतंत्र लॉगिन आयडी कधीपर्यंत मिळतो, याकडे जिल्ह्यातील साडेचौदा हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लॉगिन आयडीसाठी उपसंचालकांना पत्रव्यवहार
माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा अधीक्षक म्हणून माझ्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. पण, माझा येथे लॉगिन आयडी नसल्याने माध्यमिक शिक्षकांना पगारीसाठी काही दिवस थांबावे लागेल. उपसंचालकांकडून ‘शालार्थ’चा लॉगिन आयडी प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही तातडीने पार पाडली जाईल.
- भरत कासले, प्रभारी वेतन अधीक्षक, सोलापूर
पदभार दिला, पण लॉगिन आयडीच नाही
माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षकाचा तात्पुरता पदभार प्राथमिक शिक्षण विभागाकडील भरत कासले यांच्याकडे सोपविला आहे. पण, शिक्षकांच्या पगारीसह अन्य कामांसाठी स्वतंत्र शालार्थ प्रणालीचा लॉगिन आयडी लागतो. प्रभारी अधीक्षक कासले यांच्याकडे तो लॉगिन आयडी नसल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांना पगारीसाठी आणखी ८ ते १० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.