मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून राजीनामा देणारे अर्थमंत्री सी.डी.देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 samyukta maharashtra movement c d deshmukh

मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून राजीनामा देणारे अर्थमंत्री सी.डी.देशमुख

१ मे महाराष्ट्र दिन. लाखो जणांनी आंदोलने केली, शेकडो जणांनी आपलं रक्त सांडलं, जनतेच्या एकजुटीने मग्रूर सत्तेला धडा शिकवला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. जनतेचं आंदोलन सुरू होतं मात्र काही मराठी पुढारी होते जे आपली खुर्ची वाचवण्याच्या मागे लागले होते व चळवळीला विरोध करत राहिले. मात्र एक नेता असा होता ज्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, मराठी माणसावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून थेट पंतप्रधानांना सुनावलं, देशाच्या अर्थमंत्रीपदाचा सहज राजीनामा देऊन टाकला. ते होते आधुनिक रामशास्त्री म्हणून ज्यांना ओळखलं गेलं असे डॉ. सी.डी. देशमुख

चिंतामण द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा १४ जानेवारी , १८९६ मध्ये झाला. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते.

1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाने जोर पकडला होता. सेनापती बापट, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढय़ाला धार आली होती. सर्व बंद मोर्चे या लोकशाही मार्गाने लढा सुरू झाला होता. या दरम्यान मुंबईत 21 नोव्हेंबर 1955 रोजी गृहमंत्री मोरारजी देसाईंच्या पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. तेव्हा या बेछूट गोळाबारात 105 लोकं ठार झाली. याची जखम ताजी असतानाच केंद्र सरकारने गोळीबाराची चौकशी करण्याचे देखील नाकारले. यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1956 च्या सुरुवातीस मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला होता. जवाहरलाल नेहरूंच्या वक्तव्याने आंदोलक अधिकच भडकले. या सर्व घटनांचे साक्षीदार बुद्धिवान अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख होते. या घटनेनंतर त्यांचा स्वाभिमान, मराठी बाणा जागवला आणि केंद्रीय अर्थमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा विचार देशमुखच्या डोक्यात घोळू लागला.

२५ जुलै १९५६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा न करता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतला. सी. डी. देशमुख यांच्या अस्वस्थतेचा स्फोट झाला आणि त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लोकसभेत केलेल्या घणाघाती भाषणात नेहरुंचा हुकुमशहा अशा शब्दात उल्लेख केला. देशमुखरावच्या अर्धा तास केलेल्या भाषणाने सारा देश हादरुन गेला. महाराष्ट्रतील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले.