esakal | साने गुरुजी स्मृतीदिन: पांडूरंगाला जातीपातीतून स्वतंत्र केलं ते या 'पांडूरंगा'नेच...
sakal

बोलून बातमी शोधा

साने गुरुजी स्मृतीदिन: पांडूरंगाला जातीपातीतून स्वतंत्र केलं ते या 'पांडूरंगा'नेच...

साने गुरुजी स्मृतीदिन: पांडूरंगाला जातीपातीतून स्वतंत्र केलं ते या 'पांडूरंगा'नेच...

sakal_logo
By
विनायक होगाडे

आज साने गुरुजींचा स्मृतीदिन. साने गुरुजी म्हटलं की 'श्यामची आई' हे पुस्तक, एवढीच काय ती माहिती आपल्याला साने गुरुजींबद्दल सामान्यत: माहिती असते. मातृहृदयी, हळव्या मनाचा अशीच काहीशी ओळख आपल्याला आजवर गुरुजींबाबत झाली आहे. मात्र, त्यांची अशी साचेबद्ध ओळख त्यांच्या एकूण व्यक्तीमत्त्वावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अपमान करणारी आहे. यात काहीच वाद नाहीत की, साने गुरुजी एक उत्तम दर्जाचे कवी आणि लेखक होते. त्याहून अधिक ते चांगले ते शिक्षक होते. मुलांचे साने गुरुजी असलेल्या या गुरुजींचे इतर पैलू आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. साने गुरुजी हे लढवय्ये होते. क्रांतीसेनानी होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचं योगदान अमूल्य होतंच मात्र त्यापलीकडे गुरुजींनी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि दलितांसाठी दिलेले लढे जास्त निर्णायक ठरले होते. त्यातलाच एक लढा हा 'पंढरपूरच्या मंदिर प्रवेशाचा लढा'...!

विठोबा हा कष्टकऱ्यांचा देव, राबणाऱ्यांचा पाठीराखा. मात्र त्या मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांना प्रवेश नव्हता. कित्येक शतके हे असंच सुरु होतं. जसंजसं स्वातंत्र्य जवळ येऊ लागलं तसंतसं या मंदिरप्रवेशाविषयीची चर्चा वाढू लागली. पंढरपूरच्या मंदिरातील बडव्यांनी अस्पृष्यांच्या या प्रवेशाला अर्थातच जोरदार विरोध केला. त्यांच्या साथीला अर्थातच तत्कालिन सनातनी मंडळी उभी होती. अशावेळी स्वत: ब्राह्मण जातीतून आलेला एक 'पांडुरंग' गांधीवादी मार्गाने अस्पृष्यांच्या मानवी हक्कांसाठी म्हणून सनातनी व्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला पहायला मिळाला. साने गुरुजींनी पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांनाही प्रवेश मिळावा म्हणून मोठं आदोलन उभं केलं. स्वांतत्र्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच जानेवारी 1947 ते मे 1947 मध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं.

हेही वाचा: स्मृतीदिन: 'श्यामच्या आई'पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?

साने गुरुजी म्हणतात, "मी सात आठ महिन्यांत जो प्रचार (हंगामी सरकारसाठीचा निवडणूक प्रचार) केला त्यात अस्पृश्यतेविषयीच सांगत असे. मुंबई सरकार आता कायदाही करत आहे. परंतु मनोबुद्धीतच जी क्रांती झाली पाहिजे, ती अद्याप झाली नाही. पंढरपूर मंदिर मोकळे व्हावे; पांडुरंगाच्या पायी हरिजनांना डोके ठेवता यावे, यासाठी आज मी एकादशीपासून उपवास करत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी विनंती आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करत राहीन."

एकीकडे स्वातंत्र्य मिळणार म्हणून सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या लाडक्या साने गुरुजींच्या उपोषणामुळे मात्र खळबळ उडाली होती. पंढरपूर म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्र. लाखो वारकरी दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात. ज्ञानोबा-तुकोबाच्या बंडखोर संतपरंपरेचा वारसा या वारीला आहे. तरीही समाजाचा मोठा घटक असलेल्या दीनदलित समाजाला या दर्शनापासून वंचित ठेवलं जात होतं. विठोबाच्या या बडव्यांनी खुद्द संत चोखोबांना दारावरून आत येऊ दिलं नव्हतं. इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचं साने गुरुजींनी ठरवलं. त्यासाठी आधी महाराष्ट्रात जनजागृती करण्यात आली. गुरुजी ज्या संघटनेला आपला प्राण मानायचे त्या राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून ही जनजागृती झाली. गुरुजींना मोठा पाठिंबा मिळालाही मात्र, विरोधाचीही धार काही कमी नव्हती.

आंदोलनाला अपार विरोध


अखेर 1 मे 1947 ला एकादशीच्या मुहूर्तावर साने गुरुजींनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात प्रायोपवेषणाला सुरवात केली. पण या उपोषणाच्या विरोधात देशभरातून सनातनी मंडळी पंढरपूरला गोळा झाली. स्वातंत्र्याच्या तोंडावर गुरुजी हा कसला अपशकून करत आहेत असं काही जणांनाच म्हणण होतं. समाजवादी विचारांच्या साने गुरुजीना कशाला हवा मंदिरप्रवेशाचा मुद्दा वगैरे टीका झाली. “जावो साने भीमापार नही खुलेगा विठ्ठलद्वार” अशा घोषणांनी साने गुरुजीना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. खुद्द गांधीजींना साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गैरसमज करून देण्यात आला. गांधीजीनी गुरुजीना ताबोडतोब हे उपोषण थांबवा अशी तार पाठवली. साने गुरुजी ज्यांना आपला नेता मानायचे आणि ज्यांच्या मार्गाने हे आंदोलन सुरु होतं, त्या महात्मा गांधींना मात्र, या आंदोलनाविषयी गैरसमज झाले होते.

हेही वाचा: साने गुरुजी स्मृतीदिन: गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दर्शवणारे दुर्मिळ फोटो

महात्मा गांधींचा गैरसमज आणि पत्रव्यवहारगांधीजींनी साने गुरुजींना तार पाठवत म्हटलं होतं की, माझ्यापुढे जी वस्तुस्थिती आली आहे, ती पाहता तुमचे उपोषण पूर्णत: चुकीचे आहे. पंढरपूरचे मंदिर लवकरच हरिजनांसाठी खुले केले जाईल, टीकाकार कितीही मोठे असले किंवा त्यांची संख्या कितीही असली तरी तुमची महानता यांच्यापुढे त्यांचे टोमणे निष्प्रभ ठरले पाहिजेत. कृपा करून उपोषण थांबवा आणि तशी उलट तार करा.

याबाबतचा सारा वृत्तांत यदुनाथ थत्ते यांनी मांडला आहे. त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय की, महात्मा गांधींवर साने गुरुजींची नितांत श्रद्धा होती म्हणून काही मंडळी गांधीजींकडे गेली आणि मतलबीपणाने उपवासाबद्दल गांधीजींना काहीतरीच सांगितले आणि उपवासाच्या दुसऱ्याच दिवशी गांधीजींनी दिल्लीहून तार केली, "मला माहीत झालेली वस्तुस्थिती पाहाता तुमचे उपोषण सर्वस्वी चुकीचे आहे. लवकरच पंढरपूरचे मंदिर हरिजनासाठी खुले होईल कितीही मोठ्या व्यक्तीने किंवा असंख्य लोकांनी काहीही आक्षेप घेतले तरी आपण मोठेपणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. कृपया उपोषण थांबवा आणि तशी उलट तार करा." साने गुरुजींवर जणू हा आघात होता. साने गुरुजींनी उपवास सुरूच ठेवला आणि महात्मा गांधीना अती भावोत्कट असे पत्र पाठवले "आपला सल्ला मला पाळता येत नाही, मला क्षमा करा. तुमच्या तारेतला मजकूर वाचून अपार दुःख झाले. मी हे किती दु:खाने लिहीत आहे हे तुम्ही जाणालच; परंतु काही क्षण असे असतात जेंव्हा हे सारे जग विरुद्ध झाले तरी आपण अचल रहावे. ही तुमचीच शिकवण आहे. बापू, तुमच्या जवळ अनंत दया आहे, तुमच्या दृष्टीने तुमचे लेकरू चुकत असले तरी ते स्वतःची वंचना करू इच्छित नाही म्हणून तुम्हीही पाठ थोपटा हेच तुमच्या प्रियपूज्य चरणाजवळ मी मागत आहे." त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी एक पत्रक काढून आपली व्यथा व्यक्त केली. महात्मा गांधी, काँग्रेसनेते व मुंबई सरकार यांनी साने गुरुजींना उपवास सोडण्याचा सल्ला द्यावा, पण विठ्ठल मंदिराच्या बडव्यांना एकही शब्द सांगू नये !

मात्र मध्यवर्ती कायदे मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब मावळकर यांनी व इतरांनी गांधीजीचा गैरसमज दूर केला आणि बडवे-उत्पाद मंडळींनाही परोपरीने समजावले तेव्हा त्यानी मंदिर उघडण्याला आपण तयार असल्याचा प्रतिज्ञालेख न्यायालयात दिला. एव्हाना गुरुजींच्या उपवासाचे दहा दिवस पूर्ण झाले होते. बडव्यांचा मंदिर प्रवेशाच्या मार्गातील अडथळा दूर झाल्यानंतर साने गुरुजींनी मे 10, 1947 रोजी रात्री साडे आठ वाजता उपोषण सोडले.

महात्मा गांधींना हे वृत्त समजले तेव्हा प्रार्थना सभेत ते म्हणाले, "आज आणखी एक आनंदाची बातमी झाली आहे, पंढरपूरचे पुरातन आणि प्रसिद्ध असे मंदिर इतर हिंदूप्रमाणेच हरिजनांसाठीही खुले झाले आहे. याचे खास प्रेम साने गुरुजीना आहे. हरिजनासाठी हे मंदिर उघडावे म्हणून त्यांनी आमरण उपवास आरंभला होता.

आंदोलनाची यशस्विता

या विषयी चैत्रा रेडकर साधना साप्ताहिकातील "साने गुरुजींचा पंढरपूर मंदिरप्रवेश आणि हिंदू धर्मसुधारणा" या लेखात म्हणतात की, "या आंदोलनापूर्वी १९४७ च्या सत्याग्रहापूर्वी केवळ सवर्ण भक्तांना आणि शूद्र वर्णातील व कारागीर जातींमधील व्यक्तींनाच मंदिरात प्रवेशाची मुभा होती. अस्पृश्यांना स्पष्टपणे प्रवेश नाकारण्यात येत असे. अस्पृश्यांच्याही दिंड्या दर वर्षी वारीसोबत पंढरपुरात पोचत असत, पण त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे. रोहिदास दिंडी, चोखामेळा दिंडी व अजामेळा दिंडी या अनुक्रमे चर्मकार, महार व मातंग समाजाच्या दिंड्यांना पहिल्या तेवीस सवर्ण दिंड्यांपासून वेगळं काढलं जात असे. त्यांच्या दरम्यान एक घोडा चालत असे. या तीन जातींना वारीतही अस्पृश्यतेची वागणूक दिली जात असे. त्यांच्या दिंड्यांना पंढरपुराबाहेर इंद्रायणी नदीच्या काठावरच थांबवले जाई. इतर दिंड्या मात्र विठ्ठलाच्या भेटीसाठी शहरात प्रवेश करत. हा भेदाभेद नष्ट व्हावा म्हणून महाराष्ट्रभरात चार महिने प्रचारदौरा काढून साने गुरुजींनी जागोजागी भाषणं केली, या भाषणांचे सार नवयुगमध्ये ४ मे १९४७ रोजी त्यांनी लिहिलेल्या 'महाराष्ट्राला अखेरची हाक या लेखात सापडते. यातून त्यांनी वारकरी पंथातील समतेची मर्यादा उघड केली. डॉ. आंबेडकरांनी या मर्यादांवर कायमच बोट ठेवलं होतं. "वारकऱ्यांना कल्पनेच्या पातळीवर समतेचा आभास अनुभवता येतो. पण एकदा ती/तो गावात प्रवेश करता झाला की आभास नष्ट होतात. गावाची व्यवस्था जातीयवादी तर्कपद्धतीनुसार चालते, हे साने गुरुजींनी त्यांच्या भाषणामधून व लेखनातून वारंवार मांडले. समता केवळ पोथिनिष्ठ असू नये, तर तो अनुभूतीच्या पातळीवर ही समचरण देवता असल्यामुळे वारकरी पापांचा खरा संदेश समतेचा आहे, याची आठवण साने गुरुजी देऊ पाहत होते. आपला सत्याग्रह वारकरी परंपरेतील 'सत्य' समता या अस्सल प्रेरणा जागी करण्यासाठी असल्याचं त्यांनी भाषणांमधून वारंवार सांगितलं. या सत्याग्रहाद्वारे विठ्ठलभक्तांप्रमाणेच मंदिरातील बडवे आणि विश्वस्त यांचंही मनपरिवर्तन घडवण्याचा साने गुरुजींचा प्रयत्न होता. गुरुजींच्या या प्रयत्नाला महाराष्ट्राच्या विविध भागांमधून बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हरिजन सेवक संघाच्या दस्ताऐवजांनुसार, या सत्याग्रहादरम्यान २०० मंदिर अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आली. साने गुरुजी दोन्याला प्रतिसाद म्हणून काही विहिरीदेखील या करण्यात आल्या. पंढरपूरमधील मंदिर हरिजन सेवक संघाने घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर लाख लोकांनी सद्या केल्या होत्या.'