esakal | सांगलीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचाच करेक्ट‘कार्यक्रम’
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचाच करेक्ट‘कार्यक्रम’

सांगलीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचाच करेक्ट‘कार्यक्रम’

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिकेच्या राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेत काँग्रेस दिवसेंदिवस नामधारी होत आहे. शब्द दिल्यानंतरही स्थायी सभापती निवडीत एकाकी पाडल्यानंतर अर्थसंकल्पातही कॉंग्रेसचा ‘कार्यक्रम’ करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या साथीने भाजपला सत्तेतून हद्दपार केल्यानंतर राष्ट्रवादीने सत्तेची सूत्रे पुरती ताब्यात घेतल्याचे चित्र आहे.

स्थायी सभापती निवडणुकीत ‘चमत्कार’ झाला नाही. भाजपने वरकरणी तरी आपले वर्चस्व तूर्त कायम ठेवले आहे. महापौरपदाच्या रुपाने राष्ट्रवादीकडे सत्तेचा सुकाणू आहे. तथापि उपमहापौर पद पदरात असलेली काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे. कागदोपत्री भाजप नंबर एकचा पक्ष आजही आहे. काँग्रेस दुसऱ्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर असताना सत्तेत राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवले आहे. आघाडी असली तरीही तांत्रिक बाबींमुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदावर समाधान मानावे लागत आहे. खरे तर आजघडीला सारेच सत्ताधारी आहेत. काँग्रेसवर नेहमीच कुरघोडीचा राष्ट्रवादीचा इतिहास आहे. मदन पाटील यांच्या पश्‍चात काँग्रेसकडे खमके नेतृत्व नाही. त्यामुळे संख्याबळात जास्त असूनही काँग्रेसला नमते घ्यावे लागतेय. कारण काँग्रेसचे तीन गटांत विभागली आहे. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होत आहे.

काँग्रेसला हतबल करत आहे. त्यामुळे काँग्रेस सदस्यांना नाराजी व्यक्त करणे एवढेच हाती आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडेही काही सदस्यांनी गाऱ्हाणे मांडले आहे. मात्र त्यांना फारसे स्वारस्य नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे जिल्ह्याबरोबरच पालिकेची सूत्रे आहेत. राष्ट्रवादीचा पालिका क्षेत्रात विस्तार वाढवण्याचे त्यांचे डावपेच आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तो फसल्यानंतर महापालिका क्षेत्रात त्यांना फारसे यश आलेले नाही. महापालिकेत महापौरपद पटकावत त्यांनी भाजपबरोबरच काँग्रेसलाही जोरदार धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीच्या विस्तार धोरणात मदनभाऊ गट लक्ष्य आहे. शहरातील काँग्रेसची परिस्थिती पाहता सद्य:स्थितीत हे फारसे अवघड आहे, असे दिसत नाही. हा गट दिशाहीन आहे. मंगेश चव्हाण, अभिजित भोसले हे काँग्रेसचे काही नगरसेवक शहरात स्वतंत्रपणे आपले वलय तयार करीत आहेत. त्यामुळेच ताकद असूनही काँग्रेस एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. अर्थसंकल्पातकाँग्रेसच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता ही त्याची चुणूक आहे.

हेही वाचा: सावळजचा बाळू पोहोचला इंग्लडच्या मॅंचेस्टर नगरीत; सोशल मीडियावर धूम

पुन्हा ‘जेजेपी’?

भाजपने निरंजन आवटी यांना संधी देत स्थायी समिती सभापतिपदी संधी दिली असली तरी ‘कार्यक्रम’ टाळण्यासाठी आवटी यांचे वडील भाजप नेते सुरेश आवटी यांनी जयंतरावांची भेट विशेष चर्चेची झाली होती. त्याच वेळी निरंजन आवटी हे सभापती होणार. राष्ट्रवादी स्थायीमध्ये चमत्कार करण्यास उत्सुक राहणार नाही याची कुणकुण लागली होती. स्वतः सुरेश आवटी जयंतरावांच्या महाविकास आघाडीच्या काळात स्थायीचे सभापती होते. याआधी त्यांनी एका पुत्राला भाजपमधून सभापतिपदाची संधी दिली होती. आता पुन्हा दुसऱ्या पुत्राला संधी देत त्यांनी आपले वजन सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीचा विरोध शांत करण्यामागची गणिते हळूहळू स्पष्ट होतील. तथापि सध्या आघाडी असूनही काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र असून अप्रत्यक्षपणे पुन्हा महापालिकेत जेजेपी (जयंत जनता पार्टीचे) संकेत दिसत आहेत.

loading image
go to top