मराठ्यांच्या शौर्याचा साक्षी साल्हेर भाडेतत्वावर..!

संजय मिस्कीन
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

राजांचे सवंगडी सुर्याजी काकडेंनी दिलं होतं बलिदान 
- मोगलांसोबत रणकंदन झाले होते
- बालपणीचे सवंगडी होते सुर्याजी काकडे 
- बाललाण तालुक्यातील साल्हेर किल्ला 
- घोडबंदरचाही नव्या धोरणात समावेश 

मुंबई : राज्यातील गडकिल्ले भाडेतत्वावर देताना छत्रपती शिवाजी राजे यांच्या शौर्याचा इतिहास असलेल्या साल्हेर किल्ल्याचा देखील समावेश नव्या धोरणात केला आहे. साल्हेर हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातला दुर्ग आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच दुर्ग म्हणून साल्हेरची ओळख आहे.

1672-73 च्या दरम्यान मोगलांच्या ताब्यात असलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांनी समोरा समोर युध्द करून जिंकून घेतला होता. साल्हेरची लढाई ही स्वराजाच्या इतिहासातील महत्वाची लढाई मानली जाते. मराठा साम्राज्याच्या शौर्याचा साक्षीदार साल्हेरचा किल्ला आहे. या लढाईत छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी सुर्याजी काकडे यांचे बलिदान झाले होते.

मोगल सैन्याकडून हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सुर्याजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांची एक तुकडी गेली होती. अत्यंत उंचीवरचा हा किल्ला कोणालाही जिंकणं अशक्य होतं. चारी बाजूनं उंच सुळके व निसरडी वाट यामुळं चढाई करणं अशक्य वाटत असताना छत्रपतींच्या कुशल युध्दनिती व कणखर मावळ्यांमुळे स्वराज्यात समाविष्ठ झाला. या किल्ल्याची लढाई समोरा समोर झाल्याने मोगलांना मावळ्यांची दहशत बसली होती. 

मराठ्यांच्या साम्राज्यात साल्हेरचं महत्व अनन्य साधारण आहे. हा किल्ला खासगी विकसकाला भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. याशिवाय, घोडबंदर किल्ला देखील खासगी विकसकाला देण्यात येणार आहे. वसईच्या किल्ल्याकडे जाताना छत्रपतींचा संबध घोडबंदरशी आलेला आहे. शिवनेरी वरून कल्याण मार्गे घोडबंदर नेच शिवाजी राजे जात असत समुद्रामार्गे व्यापार करत असत. त्यांच्या घोड्यांचा जाण्याचा मार्ग होता म्हणून या बंदराचे नाव घोडबंदर पडल्याचे सांगितले जाते. 

पहिल्या पंचविस किल्ले खासगी विकसकाला देण्याचा निर्णय झाला असून सुरूवातीला नऊ किल्ल्यांची यादी समोर आलेली आहे. यामधे साल्हेर, घोडबंदर, कंधार, नगरधान, नांदूर, कोरीगड, लालिंग, पारोळा या किल्ल्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Miskin Article Writes Salher fort is Witness of bravery on renting