गडी एकटा लढला! | Election Results

संजय मिस्कीन
Thursday, 24 October 2019

यंदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मैदान गाजवलं ते शरद पवार नावाच्या राजकारणातील 80 वर्षांच्या पैलवानानं, पायांच्या बोटांना जखमा झालेल्या असतानाही पवार सर्वच आघाड्यांवर सरकारशी एकटे लढत होते. पवारांच्या वादळी प्रचाराने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. 

यंदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मैदान गाजवलं ते शरद पवार नावाच्या राजकारणातील 80 वर्षांच्या पैलवानानं, पायांच्या बोटांना जखमा झालेल्या असतानाही पवार सर्वच आघाड्यांवर सरकारशी एकटे लढत होते. पवारांच्या वादळी प्रचाराने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. 

निवडणुकीच्या आधी भाजपच्या आव्हानासमोर विरोधक कुमकुवत वाटत असताना हे आव्हान शरद पवार यांनी या वयातही लीलया पेललं. दररोज चार सभा. गाडीने प्रवास. राजकारणातील तरुणांनाही लाजवेल असा दांडगा उत्साह व ऊर्जा घेऊन ते मैदानात लढत होते. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी पवारांनी प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. एका बाजूला पराभूत मानसिकतेचा पक्ष तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या बाहुबली नेत्यांची आक्रमक भाषणे! अशा विपरीत स्थितीत पवारांनी निवडणुकीत स्वत:ला झोकून दिलं. परिणामांची पर्वा न करता शरद पवारांनी आत्मविश्वावसाचा "लंगोट' लावला होता.

कधीही न थकणारा न झुकणारा नेता म्हणून पवारांची ओळख अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत होता. 2014 ला दूर गेलेली युवा पिढी जवळ करण्यासाठी 80 वर्षांचे शरद पवार एकटे लढत होते. भाजपच्या लढवय्या नेत्यांच्या फळीला ते एकटेच भिडले होते. पक्षातील नेते आमदार दररोज भाजपमध्ये भरती होत असताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्याचा पण केला होता. त्यांच्या या परिश्रमाला राज्यातल्या तरुणाईने प्रतिसाद दिला. युवा मतदारांच्या मनात व मनगटात पवारांनी लढण्याची शक्तील निर्माण केल्याचे चित्र पहायला मिळाले. "दिल्लीच्या तख्तापुढं झुकण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही' हा पवारांचा नारा महाराष्ट्रात घुमला होता. "ईडी'च्या कारवाईला आक्रमकपणे प्रतिआव्हान देत पवारांनी राष्ट्रवादीसह पुरोगामी विचारांच्या मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवा वक्तेा अमोल मिटकरी यांच्या सारख्या तडफदार नेत्यांची फळी असतानाही शरद पवार या सर्वात उठून दिसत होते. आक्रमकता हा शरद पवार यांचा स्वभाव नाही. पण, या वेळी त्यांच्यातला हा नवा गुणही महाराष्ट्राने पाहिला. भाजप व शिवसेना नेत्यांचा प्रचारातला करिष्मा शरद पवार यांनी एकट्याने हाणून पाडल्याचे चित्र होते. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते फारसे प्रत्युत्तर देत नसताना शरद पवार यांनी मात्र "खरा पैलवान' कोण असा टोला त्यांना लगावला होता.

सत्ताधारी भाजपच्या प्रचारातील सगळी अस्त्रे निष्प्रभ कशी होतील यावरच पवारांचा सर्वस्वी भर होता. प्रत्येक सभेत टाळ्या, शिट्या अन घोषणा यांचा प्रत्यय पहिल्यांदाच पवारांच्या सभांमध्ये पहायला मिळत होता. सातारच्या सभेत भर पावसात शरद पवार यांनी केलेल्या भाषणाने तर निवडणुकीचे रंगच पालटून टाकले. पवारांचा तो पावसात भिजतानाचा फोटो निवडणुकीतला सर्वोच्च भावूक क्षण ठरला अन पवारांचा चाहता वर्ग पेटून उठला. पवारांच्या या झंझावाती प्रचारात त्यांचे बालपणीचे मित्र व सातारचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी "गडी एकटा निघाला..' हे गाणं लिहून या भावनिक वातावरणात अधिकच भर घातली. पवारांच्या या प्रचाराकडे पाहताना "गडी एकटा निघाला' या शब्दांना खरा अर्थ मिळाला होता असेच म्हणावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay miskin Writes article on Sharad pawar